Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राफेल विमान खरेदीत देशाचे 40 हजार कोटींचे नुकसान
ऐक्य समूह
Wednesday, March 21, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : मोदी सरकारने फ्रान्सबरोबर केलेल्या राफेल विमान खरेदी व्यवहारात देशाचे 40 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या यूपीए सरकारने ही विमाने खरेदीच केली नव्हती तर त्यावेळची किंमत आणि सध्याची किंमत यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही, असे सीतारमन यांनी म्हटले होते.
यूपीए सरकारने प्रति विमानांसाठी 526 कोटी रुपये देण्याचे निश्‍चित केले होते. पण मोदींनी प्रति विमानांसाठी 1670 कोटी मोजले आहेत. यामुळे देशाचे 40 हजार कोटींहून अधिक  रुपयांचे नुकसान झाले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर निशाणा साधला होता. प्रकरण भ्रष्टाचाराचे असो किंवा राफेल सौद्याचे किंवा पीएनबी घोटाळा या प्रत्येक प्रकरणात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. मोदी हे भ्रष्टाचाराविरोधात लढत नसून ते स्वत:च भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्या समोर देशाचे नियंत्रण भ्रष्ट आणि शक्तिशाली लोक करत आहेत, असा आरोप केला होता. पांडवांसारखी काँग्रेस सत्यासाठी लढणारी आहे तर भाजप आणि आरएसएस हे कौरवांसारखे सत्तेसाठी लढणारे आहेत. खर्‍या गोष्टी पंतप्रधानांना सांगितल्यावर ते दुसरीकडे आपले लक्ष वळवतात. यामध्ये सर्जिकल स्ट्राईक्स, नोटाबंदी यांचा समावेश आहे. सध्या देशातील लोकांकडे रोजगार नाही आणि पंतप्रधान त्यांना इंडिया गेटवर योगा करायला या असे आवाहन करतात, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: