Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची वाट लावली : मनमोहन सिंग
ऐक्य समूह
Monday, March 19, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: na1
जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न चुकीच्या पद्धतीने हाताळला
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : काँग्रेस अधिवेशनातील रविवारचा दिवस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गाजवला. मितभाषी म्हणून ओळखले जाणारे मनमोहन सिंग यांनी काश्मीर प्रश्‍नापासून ते भारताच्या अर्थव्यवस्थेवर जोरदार भाषण करत मोदी सरकारवर हल्ला चढवला. मोदी सरकारने लोकांचा विश्‍वासघात केला असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश केला आहे, असा घणाघात त्यांनी केला.
काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनात पक्षाच्या पदाधिकार्‍यांना संबोधित करताना ते बोलत होते. भाजप सरकारने लोकांना भव्य स्वप्ने दाखवली होती. भरमसाट आश्‍वासनांची खैरात वाटली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यातील एकही आश्‍वासन सरकारला पाळता आले नाही. मोदींनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा दावा केला होता. मात्र, तसे करण्यासाठी कृषी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 12 टक्के असायला हवा. सध्याच्या परस्थितीत तशी कल्पनाही करता येणार नाही.
मोदींनी 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचा शब्द दिला होता. मात्र, 2 लाख रोजगार निर्माण झाल्याचेही आमच्या ऐकिवात नाही. हे आश्‍वासन म्हणजे कधीच प्रत्यक्षात न येणारा एक जुमला होता, असा टोला त्यांनी मोदी सरकारवर लगावला. मोदींचा नोटाबंदीचा निर्णय अविचारी आणि जीएसटी अंमलबजावणीचा निर्णय आततायी होता. या दोन्ही निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे मातेरे झाले असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला.   
जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न मोदी सरकारला हाताळता आलेला नाही. काश्मीरमध्ये असे सरकार आहे, जिथे प्रशासनाची दोने अंग एकमेकांविरुद्ध काम करताहेत. उजवा हात काय करतोय, ते डाव्या हाताला कळत नाही. भाजप-पीडीपी या दोन्ही पक्षांनी मिळून काश्मीर कधी नव्हे इतके अस्थिर करून टाकलय, असा आरोपही सिंग यांनी केला.
आरबीआयपेक्षा तिरूपती देवस्थानात
वेगाने पैसे मोजले जातात : पी. चिदंबरम
भारताच्या अर्थव्यवस्थेला जे यश मिळाले आहे त्याचे बीज 1990 मध्ये राजीव गांधी यांनीच लावले होते. त्याला डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रोत्साहन दिले. आज भाजप किंवा एनडीए काहीही म्हणोत, पण याबाबतची आकडेवारी स्वत:च सर्व काही सांगते, असे म्हणत काँग्रेसच्या धोरणांमुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांनी तिरूपती देवस्थानातील हुंडी कलेक्टर्सकडे जावे. ते तुमच्यापेक्षा जास्त वेगाने पैसे मोजतात, असा टोलाही लगावला. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या किती नोटा परत आल्या याची माहिती रिझर्व्ह बँक अद्याप देऊ शकलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर चिदंबरम यांनी रिझर्व्ह बँकेलाही उपहासात्मक सल्ला दिला. काँग्रेसच्या महाअधिवेशनात ते बोलत होते.
देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या 14 कोटींपर्यंत आणण्यात मनमोहन सिंग यांना मोठे यश आले होते. परंतु, भाजपच्या काळात आता दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या वाढल्याचा आरोप त्यांनी केला. राजीव गांधी यांच्या धोरणामुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, चलनातून बाद झालेल्या किती नोटा प्राप्त झाल्या आहेत, याची माहिती रिझर्व्ह बँक देऊ शकलेली नाही. हे पैसे मोजण्याचेच काम सुरू असल्याचे बँकेकडून सांगितले जाते. चिदंबरम यांनी यावरून बँकेच्या कारभारावर टीका केली.
मोदी हे आडनाव भ्रष्टाचाराची
ओळख बनले आहे : गांधी
मोदी हे आडनाव भ्रष्टाचाराची ओळख बनले असून, ते नीरव, ललित आणि पंतप्रधानांच्या हातमिळवणीचे प्रतीक बनले आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर प्रहार केले.
ते काँग्रेस पक्षाच्या महाधिवेशनातील समारोपाच्या भाषणात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष अमित शहा, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली.
काँग्रेस पक्षाच्या 84 व्या महाधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी समारोपाच्या भाषणाद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले.
भाजप कौरव तर काँग्रेस पांडव
आपल्या घणाघाती भाषणात राहुल गांधी यांनी भाजपला कौरवांची उपमा दिली. शतकांपूर्वी कुरुक्षेत्रावर युद्ध झाले. कौरव शक्तीशाली आणि अहंकारी होते. भाजप आणि संघ कौरवांप्रमाणे सत्तेसाठी लढत आहे, तर काँग्रेस पक्ष हा पांडवांप्रमाणे सत्यासाठी लढत आहे. भाजप कौरवांप्रमाणे सत्ता भोगण्यात गुंग आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: