Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गारपिटीसाठी 313 कोटींची मदत : देशमुख
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: mn2
46 लाख 52 हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची रक्कम बँकेकडे जमा
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेंतर्गत 46 लाख 52 हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची रक्कम बँकेकडे देण्यात आली आहे. यातील 35 लाख 68 हजार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 13 हजार 782 कोटीची रक्कम प्रत्यक्षात जमाही करण्यात आली असल्याची माहिती देताना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी सभागृहात सादर केली जाईल, अशी घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत केली.
विधानसभेत कर्जमाफीवर 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीची तपशीलवार माहिती सभागृहाला दिली. राज्यातील 77 लाख 29 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी 55 लाख शेतकर्‍यांची यादी बँकेला दिली आहे तर 29 हजार लाभार्थी हे लोकप्रतिनिधी, अधिकारी असल्यामुळे त्यांना कर्जमाफी नाकारण्यात आली. 46 लाख 52 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात येत असून प्रत्यक्ष 35 लाख 68 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा झाला आहे. वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी 31 मार्चपर्यत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफीच्या रकमेवरील व्याज माफ करण्याचा ठराव घेतला आहे. काही बँकानी मात्र व्याजमाफीला विरोध केला. जिल्हा बँकांनी व्याज माफीचा निर्णय घ्यावा, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
गारपीटग्रस्तांना मदतीसाठी 313 कोटी
फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 2 लाख 93 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने गहू, कापूस, हरभरा यासह फळबागांचे नुकसान झाले आहे. महिनाभरातच त्याचे पंचनामे करण्यात आले आहे. यासाठी 313 कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे वितरित करण्यात आले असून  केंद्र शासनाकडे देखील मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: