Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
औरंगाबाद कचरा डेपोविरोधी आंदोलनाला हिंसक वळण
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:36 AM (IST)
Tags: mn3
9 पोलीस जखमी, पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
5औरंगाबाद, दि. 7 (वृत्तसंस्था) : औरंगाबादमधील कचराप्रश्‍न पेटला असून बुधवारी दुपारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत 9 पोलीस जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
औरंगाबादमध्ये गेल्या 20 दिवसांपासून कचरा प्रश्‍न पेटला आहे.  बुधवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा गावाजवळ स्थानिकांनी आंदोलन केले.  संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर जमावाने पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केले. यात 9 पोलीस जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचादेखील समावेश आहे. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात सुमारे 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
शहरात साचणारा तब्बल 611 टन कचरा उचलून तो कांचनवाडी, मिटमिटा भागात टाकण्यात होता. मिटमिटा येथील ग्रामस्थांनीही कचरा टाकण्यास विरोध दर्शवला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देखील मिटमिटा येथे कचरा टाकण्यासाठी आलेल्या सात-आठ वाहनांपैकी एक गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला होता तर पैठण रोडवरील कांचनवाडीजवळ एस.टी.सह काही वाहनांवर दगडफेक झाली.
पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
नारेगाव-मांडकी शिवारातील गावकर्‍यांनी 16 फेब्रुवारीपासून कचरा डेपोविरोधात आंदोलन सुरू केले आहे. यामुळे गेल्या 19 दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. परिणामी शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचले आहेत.     
पोलिसांनी यापूर्वी ग्रामस्थांचे आंदोलन मोडून काढण्याचाही प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. अखेर पोलीस सुरक्षेत कचर्‍याचे ट्रक आज नेण्यात आले. पण ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. या घटनेनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. आतापर्यंत 50 ते 60 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: