Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संपूर्ण भूसंपादनाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करणार
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: mn3
ऊर्जामंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा
5मुंबई, दि.7 (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या दोंडाईचा ऊर्जा प्रकल्पाच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. अधिवेशन संपण्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या नावाची घोषणा करण्यात येईल. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेत 293 अन्वये शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी दोंडाईचा ऊर्जा प्रकल्पासाठी भूसंपादन करताना अनेक घोटाळे झाल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी धर्मा पाटील यांची आत्महत्या ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले. आत्महत्येच्या एक महिन्यापूर्वी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी महसूल मंत्री व धुळ्याच्या पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले होते. परंतु, सरकारने वेळीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. धर्मा पाटील दोन वर्षांपासून जमिनीच्या फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी वणवण भटकत होते. पण ते जीवंत असेपर्यंत सरकारने त्यांना दाद दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र काही तासातच सरकारने फेरमूल्यांकनाचा निर्णय घेतला. याचाच अर्थ या सरकारने जाणून-बुजून धर्मा पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केले.  त्यामुळे त्यांच्याविरुद्ध 302 चा गुन्हा का दाखल होऊ नये, असा सवाल विखे-पाटील यांनी उपस्थित केला. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण फक्त त्यांना योग्य मोबदला देण्यापुरते मर्यादित नाही. या आत्महत्येतून इतरही अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. औष्णिक वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन संपादित करताना त्यांना केवळ 4 लाख रुपये देण्यात आले. पण बाजूलाच एका मंत्र्याचे नातेवाईक असलेल्या पद्मसिंह गिरासे यांची शेती होती. त्यांना मात्र 78 गुंठ्यांसाठी  तब्बल 1 कोटी 89 लाख रुपयांचा मोबदला कसा मिळाला, असा सवाल त्यांनी केला. धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या संपादित जमिनीची पर्यटन मंत्र्यांनी केलेल्या खरेदीबाबतही विखे-पाटील यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले.
 काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या जमिनीवर आंब्यांची रोपे होती का झाडे होती हा प्रश्‍न नसून इतरांपेक्षा पाटील यांना कमी रक्कम कशी मिळते हा प्रमुख मुद्दा असल्याकडे लक्ष वेधले. या प्रकरणात कोण दलाल सहभागी आहेत याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चेला उत्तर दिले. धर्मा पाटील यांची जमीन 2004 साली नोटीफाय करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कमी मोबदला मिळाला. त्याचबरोबर त्यांच्या जमिनीचा पंचनामा करण्यात आला त्यावेळी त्यांच्या 5 एकर जमिनीवर फक्त आंब्याची रोपे असल्याची नोंद होती. त्यामुळे त्याची नुकसान भरपाईची रक्कम त्याप्रमाणेच निर्धारित करण्यात आल्याचे सांगत कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यावर धर्मा पाटील यांची सही असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मात्र, याबाबत निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत त्या दलालांची चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच धर्मा पाटील यांना जवळपास 26 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असून 2004 ते 2017 या कालावधीसाठी 12 टक्के व्याजही प्रति वर्षाच्या अनुषंगाने देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: