Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रस्तावित शिवस्मारकाच्या उंचीवरुन खडाजंगी
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: mn1
विधानसभेत विरोधकांचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या उंचीवरून बुधवारी विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सरकारने मूळ आराखड्यात बदल करून महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मीटरवरून 126 मीटर कमी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या भाजपची पुतळ्याची उंची कमी करण्याचे धाडस होतेच कसे, असा सवाल करत विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली तर छत्रपतींच्या पुतळ्याची उंची 210 मीटर राहणार आहे. विरोधक स्मारकावरून राजकारण करत असल्याचा आरोप अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करून छत्रपती शिवरायांचे जगातील सर्वात भव्य असे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही देताना विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.
बुधवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाच्या उंचीचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निविदा काढताना सरकारने मूळ आराखड्यात बदल केला आहे. महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मीटर वरून 126 मीटर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पहिल्या आराखड्याला पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असताना पुन्हा नवीन आराखडा तयार करण्याची गरजच काय, असा सवाल त्यांनी केला. छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आला अन् महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करता याबद्दल महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे ठणकावतानाच या विषयावर सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. जयंत पाटील यांच्या मागणीचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, गणपतराव देशमुख यांनी समर्थन केले.
छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय हा गंभीर विषय आहे. सरकारने असंवेदनशीलता दाखवत जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असा संताप विखे-पाटील यांनी व्यक्त केला. यापूर्वीच्या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली होती. परंतु त्यात बदल करताना पुतळ्याची उंची कमी करून चबुतर्‍याची उंची वाढवण्यात आल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.    
स्मारकाच्या रचनेत बदल केल्याने पुन्हा पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तोवर काम सुरू करता येत नसल्याने स्मारकाचे काम रखडले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. राज्यातील तमाम शिवप्रेमींना संतप्त करणारी ही गोष्ट आहे. पंतप्रधानांनी शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतरही स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. जगातले सर्वात उंच स्मारक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हायला हवेय. ते कमी करण्याचा प्रयत्न झाला तर तुम्हाला जनता माफ करणार नाही, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
आरोप चुकीचे, सरकार चर्चेला तयार : मुनगंटीवार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांचे आरोप फेटाळताना पुतळ्याची उंची कमी केलेली नसल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जगातला सर्वात उंच पुतळा असेल असे सांगतानाच छत्रपतींचा पुतळा 210 मीटर उंचीचा तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. 2001 मध्ये महाराजांच्या स्मारकाचा निर्णय झाला. मात्र स्मारकाचे काम सुरू व्हायला 2018 साल उजडावे लागले. मागच्या सरकारच्या काळात प्रस्ताव पुढे गेला नव्हता, तो आमच्या सरकारच्या काळात मार्गी लागला ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे विरोकांनी राजकारण करू नये, असे आवाहन करतानाच हिम्मत असेल तर चर्चा करा, असे आव्हानही त्यांनी दिले. यामुळे गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. तहकुबीनंतर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला.
जगातले सर्वात उंच स्मारक उभारणार : मुख्यमंत्री
दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करताना विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. वास्तुविशारदांच्या सल्ल्यानुसार या स्मारकाची रचना व त्याची उंची ही गुणोत्तर प्रमाण ठरवण्यात आले आहे. विरोधकांची सत्ता असताना महाराजांच्या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली. राज्य व केंद्रात यांचीच सत्ता होती. मात्र, यांना स्मारकाची एकही वीट रचता आली नाही, असे सुनावताना छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक हे जगातले सर्वात उंच स्मारक असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: