Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निर्णय होईपर्यंत परिचारकांना विधानपरिषदेत येण्यास मनाई!
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: mn1
5मुंबई, दि.6 (प्रतिनिधी) : सैनिकांचा अवमान करणारे भाजपचे विधानपरिषदेतील सहयोगी सदस्य प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्यात यावे, असा प्रस्ताव शिवसेना गटनेते अनिल परब यांनी मंगळवारी विधानपरिषदेत मांडला. या प्रस्तावावरील निर्णय सभापतींनी राखून ठेवला आहे. हा निर्णय होईपर्यंत परिचारक यांना विधिमंडळ सभागृहात येण्यास मनाई करण्यात आल्यामुळे निलंबन मागे घेतले गेले असले तरी परिचारक यांना पुढील काही दिवस सभागृहाच्या बाहेरच राहावे लागणार आहे. त्यामुळे या वादावर तूर्त पडदा पडला आहे.
परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या मुद्द्यावरून मागच्या आठवड्यापासून विधिमंडळात गोंधळ सुरू होता. आज विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या अनिल परब यांनी जवानांच्या कुटुंबीयांबाबत आमदार परिचारक यांनी केलेले वक्तव्य हे एक प्रकारे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे त्यांना या सभागृहातून बडतर्फ करण्यात यावे. विधानमंडळाच्या या पवित्र सभागृहात त्यांना पाय ठेवू देऊ नका, अशी मागणी करत परिचारकांच्या निलंबनाचा मुद्या लावून धरला. संपूर्ण देशाचे लक्ष या विषयाकडे लागले असून कायद्यापेक्षा जनतेच्या भावना महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
परिचारकांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सभागृहात चर्चा करून प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याची परवानगी द्या. कुणाला जवानांबद्दल प्रेम नाही आणि परिचारकांबद्दल प्रेम आहे हे एकदा लोकांना समजू द्या, अशी मागणी करताना या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना सभागृहात येण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी परब यांनी केली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दिला.
घटनेतील तरतुदी व सभागृहाच्या नियमांची माहिती देताना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या प्रस्तावाला नियमानुसार स्थगिती देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यापूर्वी परब यांनी मांडलेले प्रस्ताव सभापतींनी नाकारले. मात्र याबाबत आज त्यांनी दाखल केलेला बडतर्फीसंदर्भातील सुधारित प्रस्ताव तपासून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी सभागृहाची भावना लक्षात घेऊन बडतर्फीच्या प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत त्यांना सभागृहात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येऊन नये, असे निर्देश सरकारला दिले. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी देखील ते मान्य करण्यात येत असल्याचे सांगितले. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या संदर्भातील निर्णय होईपर्यंत वेतन आणि भत्ते त्यांना देण्यात येऊ नये,  अशी सूचना केली. त्यामुळे या वादावर अखेर पडदा पडला.
विधानसभेत शिवसेनेचा सभात्याग!
प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी शिवसेनेने कायम ठेवत विधानसभेत जोरदार गदारोळ केला. सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करत शिवसेना आमदारांनी सभात्यागही केला. परिचारक यांच्या वक्तव्याचे समर्थन् होऊ शकत नाही. त्यांचे वक्तव्य निषेधार्हच आहे. मात्र परिचारकांच्याबाबत विधानपरिषदेत निर्णय होईल व त्यानंतर विधानसभेत सरकार निवेदन करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झाले. विधानसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी प्रशांत परिचारक यांचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने त्यांच्याविषयी काय भूमिका घेतली आहे हे स्पष्ट करण्याची त्यांनी मागणी केली. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेनेला समर्थन देताना सरकारने या प्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारला या बाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिवसाचे कामकाज संपण्यापूर्वी खुलासा करू, असे आश्‍वासन दिले. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला. परिचारक यांचे वक्तव्य निषेधार्हच आहे. त्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊच शकत नाही. मात्र परिचारक यांच्या बाबतीत विधानपरिषदेत निर्णय होणार आहे. त्यानंतर विधानसभेत निवेदन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: