Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसची सत्ता आल्यास आंध्रला विशेष राज्याचा दर्जा
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: na1
5कर्नाटक, दि. 6 (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेश या राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी टीडीपीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या कार्यकर्त्यांची मंगळवारी राहुल गांधी यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले. एवढेच नाही तर 2019 मध्ये काँग्रेसची सत्ता आली तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
आंध्र प्रदेश या राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा ही काँग्रेसचीही भूमिका आहे. 2019 मध्ये जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही सर्वात आधी या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देऊ. जर आपण सगळे एकत्र आलो तर आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या मागणीची दखल घ्यावी लागेल. आंध्र प्रदेशच्या जनतेचा हक्क त्यांना द्यावा लागेल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संसदेच्या परिसरातही आंदोलन करण्यात आले. आंध्र प्रदेशासंदर्भात सरकारने जी आश्‍वासने दिली ती पाळलेली नाहीत. ती पाळावीत ही देखील आमची अपेक्षा आहे,  अशी प्रतिक्रिया टीडीपीचे नेते जयदेव गाला यांनी दिली. तर टीडीपीचे खासदार शिव प्रसाद यांनी कृष्णाच्या रुपात संसदेत प्रवेश केला आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जावा यासाठी 2014 पासून संघर्ष सुरू आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेतलेला नाही. अशात आंध्र प्रदेशात सत्ता आली तर आम्ही या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देऊ, असे आश्‍वासन काँग्रेस राहुल गांधी यांनी दिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: