Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा शहरात घरफोड्या, चोर्‍या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: lo2
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 8 गुन्ह्यांची कबुली
5सातारा, दि. 6 : गेल्या काही महिन्यांपासून सातारा शहर व परिसरात घरफोड्या व चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्याचे सातारा पोलिसांसमोर आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नटराज मंदिर चौक परिसरात संशयितरीत्या फिरणार्‍या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता तो रेकॉर्डवरील सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याने सातारा शहर व परिसरात रात्रीच्यावेळी 8 ठिकाणी घरफोड्या व चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे.
सातारा शहर व परिसरातील घरफोड्या व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. मंगळवारी पोलीस निरीक्षक घनवट यांना खास बातमीदारामार्फत एक संशयित व्यक्ती चोरीचा माल पोत्यात भरुन विकण्यासाठी नटराज मंदिर चौकातील पुलाजवळ आलेला असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले. या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे नटराज मंदिर येथील उड्डाण पुलाजवळ सापळा लावला. मिळालेल्या बातमीप्रमाणे एक संशयित व्यक्ती पोत्यात काहीतरी घेऊन उड्डाण पुलाजवळ असलेल्या रिक्षा स्टॉपशेजारी उभा असलेला दिसला. त्याला पथकाने मालासह शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर तो सराईत व रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्या ताब्यात चोरी केलेला सोनी कंपनीचा एलईडी टी.व्ही., मोबाईल आदी ऐवज मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केला असता त्याने सातारा शहर व परिसरात रात्रीच्या वेळी एकूण 8 ठिकाणी घरफोड्या व चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे. संशयिताला मालासह सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून पुढील तपास चालू असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाईत सहाय्यक फौजदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, हवालदार उत्तम दबडे, रामा गुरव, पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुबीन मुलाणी, विक्रम पिसाळ, नीलेश काटकर, मारुती लाटणे, संजय जाधव, विजय सावंत आदींनी सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: