Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिप्लब देब होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: na2
जिष्णू बर्मन उपमुख्यमंत्री, 9 रोजी शपथविधी
5त्रिपुरा, दि. 6 (वृत्तसंस्था) : त्रिपुरात डाव्यांच्या लाल किल्ल्याला भगदाड पाडून भाजपने सत्ता काबीज केली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेले बिप्लब कुमार देब यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांचा शपथविधी दि. 9 रोजी होणार आहे. जिष्णू देब बर्मन हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची घोषणा केली.
मंगळवारी भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. बैठकीत बिप्लब कुमार देब आणि जिष्णू देब बर्मन या दोघांच्या नावाबाबत चर्चा झाली. त्यानंतर बिप्लब कुमार देब यांची मुख्यमंत्रिपदी आणि जिष्णू बर्मन यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर जिष्णू बर्मन यांनी आनंद व्यक्त केला. बिप्लब कुमार देब आणि मी एकत्रितरित्या त्रिपुराचा सर्वांगीण विकास करू. तसेच त्रिपुरा हे भारतातील क्रमांक 1 चे राज्य कसे होईल यासाठीही प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बर्मन यांनी दिली.
शिक्षण, ग्रामविकास, आदिवासी विकास, आरोग्य हे राज्यातील सर्वात मोठे प्रश्‍न आहेत. त्यावर जास्तीत जास्त भर देऊन त्रिपुरा राज्य विकासाच्या मार्गावर आणायचे असल्याचे बर्मन यांनी स्पष्ट केले. जिष्णू बर्मन हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आदिवासी बांधव समाधानी व्हावेत म्हणून बर्मन यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.   
15 वर्षांपूर्वी बिप्लब कुमार देब दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी आले होते. त्यावेळी एका जिममध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी काम केले. 2016 मध्ये त्यांना पक्षाने त्रिपुरात पाठवले. त्यानंतर त्यांनी त्रिपुरात भाजपला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे पहिले दावेदार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. अपेक्षेप्रमाणे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: