Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नगरसेवक बाळू खंदारेला सुरुची राडा प्रकरणात सात दिवस कोठडी
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
कोठडीत आंघोळीसाठी गोंधळ घालत पोलिसांवरच अरेरावी
5सातारा, दि. 6 : सुरुची बंगल्याबाहेरील राडा प्रकरणात नगरसेवक बाळू खंदारेला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून कोठडीत असताना मंगळवारी सकाळी खंदारे याने आंघोळ करण्यासाठी आरडओरडा करत पोलिसांवर अरेरावी केली.  या घटनेने पोलीसही चांगलेच वैतागले होते. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलण्याच्या  वादातून दि. 5 ऑक्टोबरच्या रात्री सुरुची बंगल्याबाहेर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ.  श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यावेळी गोळीबार, दगडफेक झाली होती.  घटनेनंतर एका चारचाकीने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह दोन कर्मचार्‍यांना उडवले होते. त्यामध्ये ते जखमी झाले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अ‍ॅड. विक्रम पवार यांनी खा. उदयनराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकां-विरोधात तर   अजिंक्य मोहिते याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. राड्यावेळी जखमी झालेल्या पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 200 जणांवर स्वतंत्रपणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला होता. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही गटातील संशयित पसार झाले होते. पसार असणार्‍या नगरसेवक बाळू खंदारेच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर खंदारेला सातारा शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत गेलेल्या खंदारे याला सोमवारी सुरुची राड्याप्रकरणी अजिंक्य मोहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार अटक करण्यात आली. अटकेतील खंदारेला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले होते. यानुसार त्याची रवानगी सातारा शहर पोलीस ठाण्याजवळ असणार्‍या कोठडीत करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास कोठडीत असणार्‍या खंदारेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मला आंघोळ करायची आहे, बाहेर काढा, असे जोरजोराने ओरडत खंदारेने पोलिसांवर अरेरावी करण्यास सुरुवात केली. पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे पाहून खंदारेने नंतर जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. कोठडीतील गोंधळाची माहिती त्या ठिकाणच्या कर्मचार्‍यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यास देत त्याचा तपास करणार्‍या पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांना दिली. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: