Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय अद्याप नाही : अशोक चव्हाण
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: mn2
5लातूर, दि. 4 (वृत्तसंस्था) : राज्यात आगामी निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यातील नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात येणार आहे. तेच त्या बाबतीत निर्णय घेतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच आर्थिक निकषावर आरक्षण हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे व्यक्तीगत मत आहे. या बाबतीत काँग्रेस पक्ष पातळीवर व्यापक चर्चा करूनच नंतर निर्णय घेईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिराच्या निमित्ताने चव्हाण येथे आले होते. शिबिरातून प्रत्येक जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांशी आघाडी करण्याच्या संदर्भात मत जाणून घेतली जात आहेत. राज्य पातळीवरील नेत्यांना देखील आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर याचा अहवाल राहुल गांधी यांना सादर केला जाईल. तेच आघाडीसंदर्भात निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. संविधानाने दिलेले आरक्षण हे कायम राहिलेच पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आर्थिक निकष किंवा शेतकर्‍यांना आरक्षण या संदर्भात पक्षीय पातळीवर याची व्यापक चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
विविध राज्यातील निवडणुकात काँग्रेसचा पराभव होत आहे. ही खरी गोष्ट आहे. त्याला राहुल गांधी हे जबाबदार आहेत किंवा त्यांचे नेतृत्व लोकांना मान्य नाही, असे म्हणता येणार नाही. ती राज्य व स्थानिकच्या नेत्यांची जबाबदारी असते. पोटनिवडणुकात पक्षाला मोठे यश आले आहे हे विसरता येणार नाही, असे ते म्हणाले.
सध्याचे राज्य सरकार बोलण्यात ऑनलाइन व कृतीत ऑफ लाइन आहे. तेराशे शाळा बंद केल्या जात आहेत तर दुसरीकडे दारुच्या दुकानांना परवानगी दिली जात आहे. राज्यात सामाजिक स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.  
शेतकर्‍यांच्या मालाला भाव, बेरोजगार तरुणाला काम दिले तर मंत्रालयात जाळ्या लावण्याची वेळ येणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख,  हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख आदी उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: