Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक शांततेत
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: mn5
बुधवारी निकाल
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी रविवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरातील केंद्रांवर अनुक्रमे 1 हजार 29 आणि 794 सभासदांनी मतदान केले. यावेळी नाट्य परिषद शाखांच्या सर्वसामान्य सभासदांबरोबरच मान्यवर कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला. बुधवारी (7 मार्च) सायंकाळी साडेपाचनंतर या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मुंबई शहर विभागात माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुल येथे 4 तर गिरगाव येथील साहित्य संघात 1 अशी एकूण 5 मतदान केंद्रे होती. तर उपनगरात बोरिवली आणि मुलुंड येथे प्रत्येकी एक अशा 2 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. मुंबई आणि उपनगरात निवडणुकीची प्रक्रिया उत्साहात आणि कोणतीही तक्रार न येता पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी सांगितले.
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक यंदा नव्या घटनेनुसार पार पडली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि बेळगाव येथे 27 मतदान केंद्रे होती. या वेळी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर येऊनच मतदारांना मतदान करायचे होते. निवडणुकीचा निकाल 7 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर होणार असून निवडणुकीत पात्र मतदारांची एकूण संख्या 13 हजार 568 इतकी असल्याची माहितीही दळवी यांनी दिली.
नाट्य परिषदेच्या साठ जणांच्या नियामक मंडळासाठी झालेल्या या पंचवार्षिक (2018 ते 2023) निवडणुकीत 60 पैकी 25 जागांवर यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 35 जागांसाठी 77 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.     
बहुचर्चित आणि बहुरंगी ठरलेल्या या निवडणुकीत मुंबईतून नाट्य परिषदेचे मावळते अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या ‘मोहन जोशी पॅनेल’ आणि व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनेल’ या दोन आघाड्यांमध्ये खरी चुरस आहे. या दोन आघाड्यांबरोबरच ‘नटराज पॅनेल’ आणि पाच अपक्ष उमेदवारांची ‘अपक्ष’ आघाडीही निवडणूक रिंगणात होती. मुंबईतील निवडणूक लढविणार्‍या या सर्व आघाड्यांनी आपापला स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: