Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांच्यामुळे देशाची फाळणी : अब्दुल्ला
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: na6
5जम्मू, दि. 4 (वृत्तसंस्था) : मोहम्मद अली जिना यांच्यामुळे भारताची फाळणी झाली नाही. पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे देशाची फाळणी झाली, असा खळबळजनक आरोप जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केलेे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती व्हावी ही मोहम्मद अली जिना यांची भूमिका नव्हती. मुस्लीम, शीख आणि इतर अल्पसंख्याकांना विशेषाधिकार  दिला पाहिजे यासाठी एक समिती स्थापण्यात आली होती. मोहम्मद अली जिना यांनी विशेषाधिकार समितीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांनी हा विशेषाधिकार दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने फाळणी करावी लागली, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, जम्मू यांच्यातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातही फारूख अब्दुल्ला यांनी हेच वक्तव्य केले. मोहम्मद अली जिना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आग्रही नव्हते. देशाची फाळणी होण्याऐवजी मुस्लीमांसाठी वेगळे नेतृत्त्व असेल असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तसेच अल्पसंख्य आणि शीख यांच्यासाठी वेगळी यंत्रणा असेल असेही समितीने म्हटले होते. मोहम्मद अली जिना यांना हा प्रस्ताव मंजूर होता. मात्र जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल या तिघांनीही हा प्रस्ताव धुडकावला. त्यानंतर जिना यांनी पाकिस्तानची मागणी केली. त्यावेळी पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेण्यात चूक केली नसती तर देशाची फाळणी झालीच नसती. आधी पाकिस्तान आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झालीच नसती. भारत अखंड राहिला असता. त्यावेळी तिरस्काराचे जे बीज रोवले गेले त्याची फळे आजही समाज भोगत आहे. धर्म आणि जातीच्या आधारावर जनतेत फूट पाडण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: