Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मेघालयात काँग्रेसेतर पक्षांचे सरकार; भाजपची खेळी
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: na5
5शिलाँग, दि. 4 (वृत्तसंस्था) : मेघालयमध्ये सत्तास्थापनेचे काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. एनपीपी, यूडीपी, पीडीएफ, भाजप आणि एचएसपीडीपी या काँग्रेसेतर पक्षांनी एनपीपीच्या नेतृत्वाखाली आघाडीची मोट बांधत सत्तास्थापनेसाठी राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडे दावा केला आहे. राज्यपालांनीही या आघाडीला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. एनपीपीचे नेते कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार आहे. दि. 6 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचे वृत्त ङ्गएएनआयफने दिले आहे.
60 सदस्य संख्या असलेल्या मेघालय विधानसभेत 21 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने आज राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. काँग्रेस नेते मुकुल संगमा यांनी राज्यपालांची भेट घेऊन हा दावा केला. मात्र, त्यानंतर काही तासातच सत्तेचे समीकरण पालटले. काँग्रेसेतर सर्व पक्षांनी आघाडीची मोट बांधत काँग्रेसला जोरदार धक्का दिला. या आघाडीने राज्यपालांची भेट घेऊन 34 आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र दिले व कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा केला. हा दावा राज्यपालांनी मान्य केला.
मेघालयात एनपीपीचे 19 आमदार निवडून आले आहेत. यूडीपी-6, पीडीएफ-4, भाजप-2, एचएसपीडीपी- 2 आणि   एक अपक्ष आमदार अशा एकूण 34 आमदारांच्या बळावर एनपीपी सत्तेत बसणार आहे. दरम्यान, आघाडीचे सरकार वाचवण्याचे आव्हान मोठे असले तरी माझ्यासोबत आलेले सर्व आमदार राज्य आणि लोकांच्या विकासासाठी एकजुटीने काम करतील, असा विश्‍वास कोनराड संगमा यांनी व्यक्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: