Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्नाटकमध्ये भाजपच बाजी मारणार : अमित शहा
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: mn2
5नागपूर, दि. 4 (वृत्तसंस्था) : त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर भाजपचे पुढील टार्गेट कर्नाटक राज्य असणार आहे. या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पूर्ण आत्मविश्‍वास असून तुम्ही लिहून ठेवा, कर्नाटकमध्येदेखील भाजपच बाजी मारणार, असे वक्तव्य त्यांनी नागपुरात केले. अमित शहा यांनी रविवारी संघ मुख्यालयात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. दिवसभर शहा नागपुरात होते, मात्र प्रसारमाध्यमांशी त्यांनी अवघ्या एका वाक्यात संवाद साधला. संघ मुख्यालयात ते सुमारे 4 तास होते.
अमित शहा यांचे रविवारी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. त्यानंतर ते थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी गडकरी व शहा यांच्यात सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. यावेळी शहा यांनी गडकरी यांच्याकडेच भोजन केले. त्यानंतर ते रविभवनकडे रवाना झाले.
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला 9 मार्चपासून रेशीमबाग येथे सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर दुपारी पावणेतीन वाजता अमित शहा संघ मुख्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सर्वात अगोदर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली व दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सहसरकार्यवाह सुरेश सोनी हेदेखील उपस्थित होते. संघ मुख्यालयात शहा यांनी नेमकी काय भूमिका मांडली याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु अखिल भारतीय प्रतिनिधी सभेसोबतच कर्नाटकमधील निवडणुकांसंदर्भातील मुद्द्यांवरदेखील निश्‍चितपणे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शहा सायंकाळी पावणेसात वाजता संघ मुख्यालयातून बाहेर पडले.  
त्रिपुरा विजय, मेघालयमधील सत्तास्थापनेसाठी प्रयत्न या मुद्द्यांवरच चर्चा करण्यासाठीच शहा नागपुरात आल्याचे कयास लावण्यात येत होते. परंतु संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात ही भेट पूर्वनियोजित होती व 9 मार्चपासून रेशीमबागेत सुरू होणार्‍या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अगोदर शहा यांनी संघ पदाधिकार्‍यांजवळ भाजपचे प्रतिनिधी म्हणून काही अपेक्षा व पुढील 3 वर्षांसाठीच्या योजनेचे प्रारुप त्यांनी यावेळी मांडले. संघात अशी प्रक्रियाच असून विविध संघटनांचे प्रतिनिधी संघश्रेष्ठींची भेट घेतात. सोमवारपासून प्रतिनिधी सभेअगोदरच्या बैठक सत्रांना प्रारंभ होणार आहे. 2015 मध्ये नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा सहभागी झाले होते. त्या बैठकीच्या 6 दिवस अगोदर अमित शहा यांना ऐन धुळवडीच्या दिवशी संघ मुख्यालयात बोलावण्यात आले होते हे विशेष.
कर्नाटकचे टार्गेट
काँग्रेसमुक्त भारत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शहांच्या नेतृत्वात भाजपची घोडदौड सुरू आहे. पुढील काळात कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत. पूर्वोत्तरमधील विजयामुळे हुरळून न जाता कर्नाटकमध्ये नेमकी काय भूमिका असायला हवी, याबाबत संघश्रेष्ठींनी शहा यांना मार्गदर्शन केले. या निवडणुकांमधील नियोजनासंबंधात यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: