Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तुमची कुवत नसल्यास शिवसेना शिवरायांवर छत्र उभारेल : उद्धव
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटे उभे करुन ठेवले आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना त्या ठिकाणी रायगड उभा करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेनेतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
गेली काही वर्ष शिवजयंतीला शिवभक्त येथे जमतात. आमचे महाराज येथे एकटेच उन्हातान्हात उभे करुन ठेवले आहेत. मात्र आता आम्ही हे पाहणार नाही, आमच्याकडून ते सहन होणार नाही. जीव्हीके, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी यांना आम्ही वारंवार सांगितले तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना येथे रायगड उभारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या डोक्यावर छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसे सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई विमानतळावर शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन शिवजयंती केवळ शिवजन्मापुरती मर्यादित नाही. आपण शिवरायांना दैवत का मानतो तर 300-400 वर्षांपूर्वी संपूर्ण हिंदुस्थान हिरव्या अंधाराने व्यापून गेला होता. त्याला छेद देऊन तमाम हिंदू, हिंदुस्थानाचा शिवरायांनी पुनर्जन्म घडवला, तो आपल्या पुनर्जन्माचा दिवस म्हणून इतक्या वर्षांनंतरही आपण त्यांना मानाचा मुजरा द्यायला जमतो. शिवरायांना साजेसा सण साजरा करणारा मर्द शिवसैनिक आजही जिवंत आहे याचा आनंद, अभिमान आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
पश्‍चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर  छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यासमोर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. एका बाजूला महाराजांची मेघडंबरी आणि समाधी असा भव्य सेट तयार करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: