Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: mn1
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान, भाजप अध्यक्षांसह पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. देशात ‘डावे’ फक्त नावाला उरले असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेद्वारे काँग्रेसला टोला लगावला.
‘आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान झाल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्‍वास दाखवला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले, पूर्वीच्या केंद्र सरकारने या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. वन, खनिज संपत्ती आणि सीमा भाग असल्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची राज्ये आहेत. मोदी यांनी सर्वप्रथम अ‍ॅक्ट इस्ट पॉलिसी तयार केली. त्यानुसार कामाला सुरुवात केली. एकात्मतेची भावना तयार करण्यात मोदी यांना यश आले. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शहा यांचे कुशल संघटनकौशल्य यामुळे कार्यकर्ते जोडले गेलेे.
एका पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदी यांच्यावर टीका करणार्‍यांच्या डोळ्यात हा निकाल म्हणजे झणझणीत अंजन आहे. हा ट्रेलर आहे, कर्नाटकात भाजपचे सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने निवडून येणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. विविध प्रकारचे भ्रम पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र जनता त्याला बॅलेटमधून उत्तर देत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देशात डावे नावाला उरले आहेत. लेफ्ट इज हार्डी लेफ्ट, अशी  परिस्थिती आहे. काल या भागात लाल सूर्य मावळला आहे आणि केसरिया रंगाच्या सूर्याचा उदय झाला आहे, असे ते म्हणाले.
मुंबईकर सुनील देवधर, त्रिपुरात डाव्यांचा
गड उद्ध्वस्त करणारा भाजपचा नायक
पूर्वोत्तर राज्यांतील भाजपच्या विजयाचे हिरो सुनील देवधर यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.   
गेली दोन वर्ष सुनील देवधर यांनी त्रिपुरात संघर्ष केला. माणिक सरकारचा बुरखा फाडला. त्यांच्या विरोधात पुस्तकाच्या रुपात चार्जशीट दाखल केले, असे म्हणत त्यांनी देवधरांचे विशेष अभिनंदन केले.
नदी संवर्धन संकल्प कार्यक्रमाच्या अनुपस्थितीबाबतही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. आरोप करणारे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, अशांना काय उत्तर द्यायचे, असा प्रतिप्रश्‍न फडणवीस यांनी विचारला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: