Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

टी-20 तिरंगी मालिकेसाठी टीम इंडिया कोलंबोत दाखल
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: sp1
5कोलंबो, दि. 4 (प्रतिनिधी) : रोहित शर्माच्या टीम इंडियासह श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश असलेल्या टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेला कोलंबोत मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी कोलंबोत दाखल झाली आहे.
आयपीएलच्या अकराव्या युद्धाचे नगारे वाजू लागले आहेत. आयपीएलच्या या युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी भारतीय क्रिकेटरसिकांना संधी मिळणार आहे ती टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेचा आनंद लुटण्याची. रोहित शर्माच्या टीम इंडियासह यजमान श्रीलंका आणि बांगलादेश संघांचा या तिरंगी मालिकेत समावेश आहे. या तिरंगी मालिकेतल्या सर्व सामन्यांचे आयोजन कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरच करण्यात आले आहे. त्यातल्या सलामीच्या सामन्यात भारताची गाठ ही श्रीलंकेशी पडणार आहे.
अनुभवी खेळाडूंना विश्रांती, रोहित शर्माकडे सूत्रे
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौर्‍यातल्या एक दिवसीय आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेत घवघवीत यश मिळवले. त्या दौर्‍याचा ताण हलका करण्यासाठी बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीसह कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या या प्रमुख शिलेदारांना विश्रांती दिली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आली आहेत.
रोहित शर्माने आजवर कर्णधार या नात्याने चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात जबाबदारी सांभाळली आहे. त्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय साजरा केला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्यानेही रोहितच्या गाठीशी आयपीएलच्या रणांगणातला सर्वोच्च अनुभव आणि यश
आहे. त्यामुळे कर्णधार
या नात्याने टीम इंडियाला श्रीलंकेत विराट कोहलीची अनुपस्थिती भासणार नाही, अशी आशा आहे.
विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची एक कर्णधार या नात्याने अनुपस्थिती जाणवू न देण्याची मोठी जबाबदारी रोहितसह शिखर धवन, सुरेश रैना आणि मनीष पांडेवर राहील. यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतचाही भारतीय फलंदाजीला मोठा आधार लाभेल. रिषभ पंतने यंदा मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत अवघ्या 32 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. श्रीलंकेतल्या मालिकेतही भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच तडफदार खेळींची अपेक्षा राहील.
युवा खेळाडूंवर
गोलंदाजीची धुरा
दक्षिण आफ्रिका दौरा गाजवणार्‍या प्रमुख गोलंदाजांऐवजी भारतीय संघात शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. शार्दुलने दक्षिण आफ्रिकेतल्या अखेरच्या टी-20 सामन्यांमध्ये मिळालेल्या
संधीचे सोने केले होते. पण डावखुर्‍या जयदेव उनाडकटवर आयपीएलच्या लिलावात आलेली साडेअकरा कोटींची बोली सार्थ ठरवण्याची अजूनही जबाबदारी आहे. चायनामन कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर भारताच्या फिरकी आक्रमणाची भिस्त राहील.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: