Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकले, आरोपीची कबुली
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतील बेपत्ता पोलीस उपनिरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बिद्रे यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि वसईच्या खाडीत टाकले, अशी धक्कादायक कबुली आरोपी महेश पळणीकर याने देतानाच बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे हे खाडीत फेकण्यापूर्वी अभय कुरुंदकरच्या भाईंदरच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवल्याचे समजते.
फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटिव्ह टीमने शुक्रवारी भाईंदरमधील मुकुंद प्लाझा या इमारतीतील कुरुंदकरच्या घराची झाडाझडती घेतली तसेच मृतदेहाचे तुकड्या ज्या फ्रीजमध्ये ठेवले होते ते ताब्यात घेण्यात आले. फ्रीज आणि त्याखालील थर्माकॉलचे स्टँड पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अश्‍विनी बिद्रे प्रकरणाची उकल अंतिम टप्प्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजू पाटील, चालक कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राइम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आतापर्यंत अश्‍विनी बिद्रेे प्रकरणी फक्त अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता चौघा आरोपींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 एप्रिल 2016 रोजी चौघा आरोपींनी एकत्र येऊन हत्या केल्याची माहिती आहे.  
तीनच दिवसांपूर्वी पळणीकरला लाकूड कटर मशीन घरात ठेवल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी बोलावले होते. महेश पळणीकर हा अभय कुरुंदकरचा बालपणीचा मित्र असून तो कुरुंदकरचे सर्व
व्यवहार करत असे. त्याला पुण्याच्या कात्रज परिसरातून
सोमवारी अटक करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर दोन महिन्यांनी तपास गुन्हे शाखेकडे देऊन तपास
अधिकारी बदली झाल्यावर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला गुन्हे अन्वेषण
शाखेकडे देण्याची मागणी अश्‍विनीच्या कुटुंबाने केली होती.
परंतु नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. मात्र, नंतर याचा तपास गुन्हे शाखेकडे गेल्यावर इतर आरोपी
समोर आले असल्याचा दावा अश्‍विनीचे पती राजू गोरे यांनी केला आहे. दरम्यान, आता अश्‍विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. मीरा-भाईंदरच्या खाडीत अश्‍विनीचा मृतदेह टाकण्यात आला होता.  यामुळे मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेण्यात येणार आहे. सोमवारी ही शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: