Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात दोन स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: lo2
अ‍ॅड. डी. जी. बनकर पदावर कायम
5सातारा, दि. 2 : सातारा नगरपालिकेच्या चारपैकी दोन स्वीकृत नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. त्यामध्ये साविआच्या एक आणि भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. साविआचे सचिव अ‍ॅड. डी. जी. बनकर यांना पदावर कायम ठेवण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. आता नविआच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या राजीनाम्यानंतर इच्छुकांनी या पदावर आपली निवड व्हावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपचे स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. प्रशांत खामकर यांनी दि. 22 फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यापाठोपाठ साविआच्या स्वीकृत नगरसेविका सौ. धनश्री महाडिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा गुरुवारी दिला. साविआकडे स्वीकृत नगरसेवकपदाच्या दोन जागा आहेत. मात्र एकच राजीनामा झाला आहे. दुसरे स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर हे खा. उदयनराजे यांचे विश्‍वासू आहेत. सातारा पालिकेतील सभागृहात होणार्‍या सभा यशस्वी करण्यासाठी तेच भूमिका बजावतात. विरोधकांनी केलेल्या आरोपांनाउत्तरे देवून साविआची बाजू तेच सध्या भक्कमपणे सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नविआचे स्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण हे केव्हा राजीनामा देणार याची आता उत्सुकता आहे. हा राजीनामा झाल्यानंतर तिन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. स्वीकृत नगरसेवक पदासाठी  इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. मात्र निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याशिवाय नेमकी कोणाला संधी मिळणार हे स्पष्ट होणार नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: