Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकाला केंद्राची मंजुरी
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयका’ला गुरुवारी मंजुरी दिली. आर्थिक घोटाळे करून परदेशात पळून जाणार्‍यांची संपत्ती जप्त करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. या कायद्याच्या सहाय्याने भारतातून देशाबाहेरील संपत्ती संबंधित देशाच्या सहकार्याने जप्त करण्यात येऊ शकते, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.
आर्थिक घोटाळे करून कारवाई टाळण्यासाठी परदेशात पळून जाणार्‍या विजय मल्ल्या, नीरव मोदी यांसारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी या विधेयकाची बर्‍याच काळापासून मागणी होत होती. अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक 2018ला मंजुरी दिली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरुण जेटली म्हणाले, फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकाला मंजुरी देशहितासाठी अत्यंत आवश्यक होती. यामुळे मोठ्या आर्थिक गुन्हेगारांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. या व्यतिरिक्त अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) या संस्थेची स्थापनाही केली. लिस्टेड आणि मोठ्या कंपन्यांसाठी याची नोंदणी बंधनकारक असणार आहे. यामुळे आर्थिक घोटाळ्यात समावेश असणार्‍या ऑडिटर्स आणि सीए यांच्यावर यामुळे कडक कायदेशीर कारवाई करता येणार आहे.
एनएफआरएद्वारे चार्टर्ड अकौंटंट आणि त्यांच्या कंपन्यांची कलम 132 अन्वये चौकशी होऊ शकते. एनएफआरए स्वायत्त नियामक संस्था म्हणून काम पाहणार आहे.
नीरव मोदी प्रकरणावरून लक्ष
हटवण्यासाठीच विधेयक : शर्मा
केंद्र सरकारने गुरुवारी ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयका’ला मंजुरी दिली. हे विधेयक म्हणजे केवळ फार्स असून नीरव मोदी प्रकरणावरून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच सरकारने या विधेयकाची खेळी केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केला आहे.
शर्मा म्हणाले, सरकारने हे सगळे लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच केले आहे.      
त्यांनी नीरव मोदी प्रकरणात काय केले आहे आणि भविष्यात काय करतील हे सर्वांनाच माहिती आहे. देशात आर्थिक फसवणूक करणार्‍यांविरोधात कारवाईसाठी आधीच अनेक कायदे आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आर्थिक गुन्हेगारांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच अनेक जणांवर गु्न्हेही दाखल केले आहेत. तरीही या अतिरिक्त कायद्याची गरजच काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले, या प्रकरणातील घोटाळेबाज देशाला लुटून पळून गेले आहेत. या गुन्हेगारांची माहिती असतानाही सरकारने हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी याला पळून जाऊ दिले. मोदी आणि चोक्सी यांच्या विरोधात 2015 मध्येच तक्रार दाखल करण्यात आली होती. याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील माहिती होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: