Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘आयएनएसव्ही तारिणी’ केप टाऊन बंदरात दाखल
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: mn2
5पणजी, दि. 2 (वृत्तसंस्था) : गोव्यातून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीवर निघालेली सहा महिला नौदल अधिकार्‍यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ ही शिडाची बोट शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन बंदरात पोचली. तेथे महिला नौदल अधिकार्‍यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीही साजरी केली.
स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत जग भ्रमंतीसाठी निघाल्या आहेत. हा जगप्रवास पूर्ण करुन एप्रिल 2018 मध्ये हे पथक गोव्यात परतणार आहे. या नौकेने आतापर्यंत 15,500 नॉटिकल मैल अंतर पार केले आहे. गोव्याहून 10 सप्टेंबर 2017 रोजी ही बोट निघाली होती. 25 सप्टेंबर रोजी या नौकेने विषुववृत्त पार केले. त्यानंतर केप ल्युवीन बंदरात 9 नोव्हेंबर आणि केप हॉर्न बंदरात 19 जानेवारी रोजी ही नौका पोहोचली. तेथून पुढील प्रवास करत आता केप टाऊन बंदरात ती दाखल झाली असल्याचे नौदलाच्यावतीने सांगण्यात आले. वाटेत अनेकदा खराब हवामानाला तोंड द्यावे लागले. 7 मिटरपर्यंत उंचीच्या लाटा तसेच ताशी 60 किलोमिटर वार्‍याच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला.  दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचे बंदर आहे. या महिन्यातच तेथून ही बोट परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या महिला नौदल अधिकारी 165 दिवसात 21,600 सागरी मैल अंतराचा प्रवास करणार आहेत. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू होती. 
महिला अधिकार्‍यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्‍वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया, न्युुझीलंड, फॉकलँड आणि दक्षिण आफ्रिकेत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ‘आयएनएसव्ही तारिणी’ बोट 55 फूट लांबीची असून गोव्यातच अ‍ॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे. या समुद्री जग प्रवासात बोटीवरील नौदल महिला अधिकार्‍यांनी समुद्रातील जैव विविधता, पर्यावरणाचा अनुभव घेतला. सागरी प्रदूषणावर हे पथक अभ्यास करणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: