Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डार्विनचा सिद्धांत अपूर्ण, पण चुकीचा नाही: डॉ. नारळीकर
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: mn4
5पुणे, दि. 2 (प्रतिनिधी) : चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत बरोबर आहे, हे अनेक निरीक्षणातून सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांचे मत खोडून काढले आहे. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतातील अनेक बाबी अजून समजलेल्या नाहीत. त्यामुळे तो सिद्धांत अपूर्ण आहे असे म्हणता येईल मात्र तो चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही, असेही डॉ. नारळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी माकड हा माणसाचा पूर्वज नसल्याचे म्हणत डार्विनचा सिद्धांत नाकारला होता. डार्विनचा सिद्धांत शाळेत शिकवला जाऊ नये असे वक्तव्यही त्यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना डॉ. नारळीकर यांनी डार्विनचा सिद्धांत बरोबर असल्याचे म्हटले आहे.
साहित्यिकांनी विज्ञान लेखन करावे
खगोलशास्त्र हे केवळ ग्रह आणि तार्‍यापुरते मर्यादित नाही तसेच इतर शास्त्रही काळानुसार पुढे गेली आहेत. विज्ञानाच्या अनेक संकल्पना सोप्या पद्धतीने मराठी भाषेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी मराठी साहित्यिकांनी अधिकाधिक विज्ञान लेखन केले पाहिजे, असे आवाहन डॉ. जयत नारळीकर यांनी पुणे साय फाय महोत्सवात विज्ञान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान केले.
नारळीकर म्हणाले, केंब्रिज विद्यापीठात असताना मार्गदर्शक फ्रेड हॉयल यांच्याकडून प्रेरणा घेऊन मराठी भाषेत विज्ञान लेखन करायला मी सुरुवात केली. विज्ञानकथेतून मुख्यत: विज्ञानाचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, परंतु मराठीमध्ये लिहिण्यात येणार्‍या विज्ञान कथा भयकथा वाटतात. त्यासाठी लेखन आणि विज्ञानाचा समतोल राखणे गरजेचे आहे.
सामान्य माणसाला विज्ञान किती आणि कसे समजते हे शास्त्र आणि अभ्यासक लक्षात घेत नाहीत. मी स्वत:ला चांगला साहित्यिक मानत नाही. त्यामुळे मी लिहिलेल्या लेखातून विज्ञान किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचते मला माहिती नाही, त्यासाठी चांगल्या मराठी साहित्यिकांनी अधिकाधिक विज्ञानासंदर्भात लेखन केले पाहिजे, असेही डॉ. जयंत नारळीकर यावेळी म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: