Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तिसर्‍या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकासदरात वाढ
ऐक्य समूह
Friday, March 02, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : चीनला मागे टाकत भारत पुन्हा एकदा जगात सर्वाधिक वेगात विकास करणारा देश ठरला आहे. सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार 2017-18 या आर्थिक वर्षातील तिसर्‍या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) भारताचा विकासदर 7.2 टक्के होता तर चीनचा विकास दर 6.8 टक्के इतका होता.
2017-18 या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास पहिल्या तिमाहीत विकास दर 5.7 टक्के होता तर दुसर्‍या तिमाहीत विकास दर 6.5 टक्के होता. 2017-18 या संपूर्ण आर्थिक वर्षाचा विकास दर 6.6 टक्के राहण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा सर्वात कमी विकास दर असेल.
2014-15 मध्ये 7.4 टक्के, 2015-16 मध्ये 8.2 टक्के आणि 2016-17 मध्ये 7.1 टक्के विकास दर नोंदवला गेला आहे. त्यामुळे 2017-18 या वर्षात 6.6 टक्के विकास दर राहिल्यास तो सर्वात कमी म्हणून नोंदवला जाईल. विकास दरांच्या अंकांमध्ये सुधारणा होण्यास उत्पादन क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास दर 8.1 टक्के आहे. गेल्या आर्थिक वर्षातही उत्पादन क्षेत्राचा एवढाच विकास दर होता. मात्र या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा विकास दर काही अंकांनी कमी झाला होता. म्हणजेच, जीएसटीचा उत्पादन क्षेत्रातील नकारात्मक प्रभाव कमी होताना दिसतो आहे. उत्पादन क्षेत्रातील विकास दर वाढण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे रोजगाराच्या संधी वाढतील.
सरकारी अधिकार्‍यांच्या मतानुसार आर्थिक विकास दरातील वाढ म्हणजे नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयातून अर्थव्यवस्था उभारी घेत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: