Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जीतनराम मांझींचा ‘एनडीए’ला अखेर रामराम
ऐक्य समूह
Friday, March 02, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: mn3
5पटना, दि. 28 (वृत्तसंस्था) : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) रामराम ठोकला आहे. ते आता राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) ‘महागठबंधन’मध्ये सामील झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि राजद नेत्या राबडीदेवी यांच्याशी याबाबत चर्चा केली.
एनडीएचा घटक पक्ष असलेल्या हिंदुस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष मांझी यांना भाजपप्रणित एनडीएमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ते अत्यंत नाराज होते. त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी उघडपणे  व्यक्त केली होती तसेच त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले होते. मात्र, तरीदेखील पक्ष नेतृत्वाकडून यावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर मांझी यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ‘महागठबंधन’मध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी राबडीदेवी यांच्याशी बराच वेळ चर्चा केली होती. त्यानंतर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राबडीदेवी आणि मांझी या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मांझी यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर केली. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादवही उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: