Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या मुलाला अटक
ऐक्य समूह
Friday, March 02, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने मोठा झटका दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना आज अटक केली.
सीबीआय चौकशीला कार्ती चिदंबरम सहकार्य करत नसल्यानेच त्यांना अटक करण्यात आल्याचे  सूत्रांनी सांगितले. कार्ती हे लंडनला गेले होते. ते लंडनहून येताच त्यांना चेन्नई येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या एका न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांचे सीए एस. भास्कररमन यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आयएनएक्स मीडिया प्रकरणी भास्कररमन यांना अटक करण्यात आली होती.
आयएनएक्स मीडिया निधीला एफआयपीबी अंतर्गत मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी पी. चिदंबरम हे संबंधित विभागाचे मंत्री होते. मुलाच्या कंपनीला फायदा मिळावा म्हणून अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी ही मंजुरी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला होता.   
त्यानंतर कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईतील पाच ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकली होती.
मोदी सरकारने सूडापोटी कारवाई केली
स्वत:चे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे लपवण्यासाठीच मोदी सरकारने कार्ती चिदंबरम यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मोदी सरकारने सूडापोटी केलेल्या कारवाईमुळे आम्ही घाबरणार नाही. यापुढेही मोदी सरकारची पोलखोल करतच राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना बुधवारी सीबीआयने चेन्नई विमानतळावरून अटक केली. या कारवाईवर रणदीप सुरजेवाला यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, स्वत:चे घोटाळे आणि भ्रष्टाचारावरून अन्यत्र लक्ष वळवण्याची मोदी सरकारची ही जुनीच पद्धत आहे. पी. चिदंबरम व त्यांच्या कुटुंबीयांवर सूडापोटी कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईनंतरही आम्ही थांबणार नाही. आम्ही मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत राहू. मोदींना जनतेला उत्तर द्यावे लागेल, असे त्यांनी नमूद केले. रोटोमॅक, नीरव मोदी, मेहुल चोक्सी प्रकरणावरून लक्ष वळण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007 मध्ये नियमापेक्षा अधिक परकीय गुंतवणूक मिळाल्यानंतर ते कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी कार्ती चिदंबरम यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या मदतीने नियम वाकवल्याचा आरोप आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: