Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन
ऐक्य समूह
Friday, March 02, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: mn1
5चेन्नई, दि. 28 (वृत्तसंस्था) : कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. कांची कामकोटी पीठाचे ते 69 वे शंकराचार्य होते.
शंकराचार्य जयेंद्र सरस्वती गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वाढत्या वयामुळे त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. गेल्या महिन्यात त्यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तत्काळ चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कमी रक्तदाबाचाही त्रास होता. आज प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
जयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 मध्ये झाला होता. ते कांचीपूरम पीठाचे 69 वे शंकराचार्य होते. 1954 मध्ये ते शंकराचार्य बनले होते. चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. कांचीपूरम मठाद्वारे अनेक शाळा आणि नेत्र रुग्णालये चालविली जातात. दरम्यान, कांचीपूरम वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन यांच्या हत्या प्रकरणात जयेंद्र सरस्वती आरोपी होते. मात्र न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली होती.
भाजप नेते राम माधव यांनी शंकराचार्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘शंकराचार्य सरस्वती हे सुधारणावादी संत होते. त्यांनी समाजासाठी वाहून घेतले होते,’ अशी भावना राम माधव यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.
संक्षिप्त जीवन चरित्र
 प. पू. जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे मूळ नाव सुब्रमण्यम महादेव अय्यर होते. त्यांचा जन्म 16 जुलै 1935 रोजी तामिळनाडूतील ईरुलनिकी गावात श्री. महादेव अय्यर यांच्या घरात झाला. नऊ वर्षांच्या वयात वेदांच्या अभ्यासासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना कांची कामकोटी मठात पाठवले. तेथे त्यांनी ऋग्वेद आणि इतर ग्रंथांचा सहा वर्षे अभ्यास केला. मठाचे 68 वे आचार्य, प. पू. जगद्गुरू शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांनी त्यांची प्रतिभा पाहिली आणि त्यांना उपनिषद वाचण्यासाठी विचारले. कदाचित ते आपल्या भावी उत्तराधिकारी सुब्रमण्यमकडे पाहत होते. पुढे त्यांनी आपल्या वडिलांबरोबर अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. ते भगवान वेंकटेश्‍वराच्या दर्शनासाठी तिरुमलालाही गेले. 22 मार्च 1954 हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस होता. या दिवशी त्यांनी  संन्यास दीक्षा ग्रहण केली. त्यानंतर 15 वर्षे त्यांनी वेद, व्याकरण आणि न्यायशास्त्र यांचा अभ्यास केला. त्यांची प्रखर साधना पाहून कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी त्यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले व त्याचे नाव जयेंद्र सरस्वती, असे ठेवले. आता त्यांचा बहुतेक वेळ पूजन, अर्चन, ध्यान यात व्यतीत होऊ लागला. परंतु देश आणि धर्मांची स्थिती पाहताना कधीकधी त्यांच्या मनाला अस्वस्थता येई. चारही बाजूंनी देश आणि धर्म संकटात असताना हिंदू मात्र निद्रिस्त आहे हे पाहून ते व्यथित होत. यावर विचारमंथन करून काही मार्ग काढण्यासाठी ते काही काळ मठ सोडून एकांतात राहिले. एकांतवासातून आल्यानंतर त्यांनी आपले सर्व पूजाधिकार कर्माधिकार आपले उत्तराधिकारी आचार्यांना देऊन ते स्वत: सर्वसामान्य हिंदुजनात फिरून प्रबोधन करू लागले. मठासाठी येणार्‍या देणग्या आणि भक्तांच्या सहकार्यातून त्यांनी विश्‍वविद्यालय, शाळा महाविद्यालये, रुग्णालये निर्माण करून अद्वितीय कार्य केले. तामिळनाडू येथे चाललेल्या हिंदूंच्या धर्मांतरा विरोधात त्यांनी प्रभावी कार्य केले. यासाठी त्यांना परधर्मधार्जिण्या शासनाच्या भयंकर रोषाला सामोरे जावे लागले. वृद्धापकाळीही त्यांचे जगदोद्धाराचे कार्य  एखाद्या तरुणाप्रमाणे सुरू होते. त्यांचे धर्मप्रसाराचे अपूर्ण कार्य आपण अव्याहतपणे सुरू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: