Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
होमगार्डला मारहाण करणारा उंब्रज पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलंबित
ऐक्य समूह
Friday, March 02, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 28 :  बंदोबस्तासाठी रात्री उंब्रज, ता.कराड येथे तैनात असणार्‍या होमगार्डला दि. 25 च्या रात्री दारूच्या नशेत मारहाण करणारा उंब्रज पोलीस ठाण्यातील कर्मचारी आण्णाराव बाबूराव मारेकर (ब.नं.1982) यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलीआहे. निलंबित मारेकर यांची खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
याबाबत देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, उंब्रज, ता. कराड येथे पोलीस ठाण्यांतर्गत सुरज खडके हा गेल्या पाच वर्षापासून होमगार्ड म्हणून काम करत आहे.  दि. 25 रोजी रात्रीच्या सुमारास सुरज खडके इतरांसमवेत बाजारपेठ चौकात रात्रगस्तीसाठी हजर होते. रात्री 11  च्या सुमारास उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी आण्णाराव मारेकर हे दारूच्या नशेत त्या ठिकाणी आले. मारेकर यांनी खडके याला तुझी ड्युटी कुठे आहे असे म्हणत  शिवीगाळ करून मारहाण केली. मारेकर यांना थांबवण्याचा प्रयत्न यावेळी बंदोबस्तावरील इतरांनी केला. घडल्या प्रकाराची माहिती वरिष्ठांना देत हाताला दुखापत झाल्याने खडके हे कराड येथे उपचारासाठी दाखल झाले. या मारहाणीचा व्हिडिओ एकाने मोबाईलवर रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ नंतर व्हायरल झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेणे वरिष्ठांना भाग पडले.  
या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्याबाबतचा अहवाल उंब्रज पोलीस ठाण्याकडून मागवला होता. या अहवालानुसार आण्णाराव मारेकर याला बुधवारी निलंबित करण्यात आले. खात्याच्या प्रतिमा मलीन करणार्‍या कर्मचार्‍यांवर कडक कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकाद्वारे दिले आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: