Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक, विधानसभेत गदारोळ
ऐक्य समूह
Wednesday, February 28, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 27 (प्रतिनिधी) शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन सहा महिने होत आले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल आक्रमक होत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आज विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केलेले वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांचे छायाचित्र असणारे फलकही विधानसभेत फडकविण्यात आले. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज सुरूवातीला तीन वेळा व अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे शेतकरी कर्जमाफीचा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याची आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा जाहीर केली. 7 फेब्रुवारी रोजी 10 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीचे नियम सात ते आठ वेळा बदलण्यात आले. आता अर्ज भरण्यास मुदतवाढ देऊ, असे म्हणतात. याचाच अर्थ ही योजना पूर्णपणे फसली असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी देखील शेतकरी कर्जमाफीची यादी अद्यापपर्यंत का जाहीर केली नाही, असा सवाल करत या विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्थगन प्रस्तावाला अनुमती नाकारल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील  मोकळ्या जागेत येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. धर्मा पाटील अमर रहे असे लिहिलेले व धर्मा पाटील यांचा फोटो असलेले फलक देखील फडकावले. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सुरूवातीला तीन वेळा तर चौथ्यांदा दिवसभराकरता तहकूब करण्यात आले.    
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: