Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अंदाजपत्रकावरुन सत्ताधार्‍यांमध्ये फूट, मोनेंच्या साथीला लेवे
ऐक्य समूह
Wednesday, February 28, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: lo2
विरोधक अंदाजपत्रकावर तुटून पडले : सत्ताधार्‍यांची उत्तरे देताना दमछाक
5सातारा, दि.27 : सातारा नगरपालिकेच्या अंदाजपत्रकावर विरोधकांसह सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकाने टीकेचा भडिमार केला. अंदाजपत्रक कसे चुकीचे आहे, असे सांगत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. विरोधकामध्ये अशोक मोने आणि वसंत लेवे यांच्या जोडीने सत्ताधार्‍यांना अंदाजपत्रकावर सळो की पळो करून सोडले. त्यांना शेखर मोरे, भाजपच्या सिद्धी पवार यांनीही विरोधात जोरदार साथ दिली. मोने-लेवे यांच्या आक्षेपांना उत्तर देता देता  सत्ताधार्‍यांच्या नाकीनऊ आले. विरोधकांच्या आरोपांनी सत्ताधार्‍यांची दमछाक झाली. विरोधकांनी केलेल्या तुफान टोलेबाजीनंतरही बहुमताच्या जोरावर सत्ताधार्‍यांनी अंदाजपत्रक मंजूर केले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम होत्या.
सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी प्रारंभी अंदाजपत्रक सादर केले. अर्थसंकल्प मांडल्यानंतर उपसूचना विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी सभागृहापुढे सादर केली. त्यानुसार त्या उपसूचनेत हे अंदाजपत्रक आकडेवारीचा घोळ करणारे, नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारे आहे. शिलकी अंदाजपत्रक नसून ते तोट्याचे आहे. त्यामुळे अंदाजत्रक नामंजूर करणे क्रमप्राप्त आहे. 2017-18 च्या अंदाजपत्रकावेळी प्राधिकरणाची 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम थकीत होती, ती दर्शवली नाही. या अंदाजपत्रकात आकड्यांचा घोळ करून शिलकी अंदाजपत्रक दाखवले आहे. ते बेकायदेशीर असून कायद्याचा उल्लंघन करणारे आहे. अपंगांच्या योजनांचा निधी त्रोटक स्वरूपात दिला जातो. इमारत भाड्याध्ये शाळा इमारत भाड्याचाही समावेश असून शिक्षण विभागाने 2004-05 पासून शाळा व इमारती या पालिकेच्या मालकीच्या असल्याने त्यांचे भाडे देता येत नाही. अंदाजपत्रकात दाखवलेली रक्कम मोघम अशी आहे. भांडार विभागाने दाखवलेले उत्पन्न 3 लाखाचे आहे. ते कोणत्या प्रकारचे?, शहरातील उद्याने विकासित करणे याकरता 50 ते 60 लाख, शॉपिंग सेंटर बांधणे 20 लाख, नगरपालिका आगप्रतिबंधक यंत्रणा 10 लाख या तरतुदी केवळ कागदोपत्रीच केल्या जातात. पर्यटन विकासास चालना देणे, सातारा शहर वायफाय करणे यासारख्या बाबींवर पालिका निधी खर्च न करता त्यासाठी शासनाकडून अनुदानासाठी प्रयत्न करावा. या उपसूचनेला शेखर मोरे पाटील यांनी अनुमोदन दिले. सिद्धी पवार यांनीही उपसूचना मांडली. त्यास धनंजय जांभळे यांनी अनुमोदन दिले. 
 स्वीकृत सदस्य नाही, जनतेतून आलो 
मोने हे आक्रमकपणाने मुद्दे मांडत असताना अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी उपसूचना मतावर घ्या आणि मंजूर करून टाका, अशी टिप्पणी करताच मोने भडकले. सत्तेच्या जोरावर दादागिरी चालणार नाही. आम्हाला येथे जनतेने निवडून दिले आहे. जनतेच्या हक्कासाठी भांडतोय. तुमच्यासारखे स्वीकृत होऊन आलो नाही, अधिकार्‍यांना पाठीशी घालता आहात हे बरोबर नाही, अशा शब्दात मोने यांनी अ‍ॅड. बनकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.  त्यानंतर सातारा विकास आघाडीचे सभागृह नेते निशांत पाटील यांनी विरोधासाठी विरोध करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. बजेटमध्ये चांगल्याही बाबी केल्या आहेत.  
त्या डोळ्यासमोर ठेवूयात  आणि उपसूचना मागे घ्या, अशी विनंती करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोने आणि सिद्धी पवार यांनी आपल्या बाजू भक्कमपणे मांडल्या.   सभागृहात वसंत लेवे यांनी बारकाईंनी त्रुटी सभागृहासमोर ठेवल्या. त्यामध्ये शासकीय अध्यादेश नाहीत. आरोग्य विभागातील लिपिकाचे कारनामे यासह मुद्दे मांडले. त्यांचे आणि विरोधी पक्षनेते मोने यांचे एकच मुद्दे आल्याने शेखर मोरे पाटील यांनी आणि सिद्धी पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.  नविआच्या नगरसेविका मनीषा काळोखे, लीना गोरे आणि दीपलक्ष्मी नाईक यांनी सभागृहात अर्थसंकल्पात महिलांसाठी काहीच तरतुदी नाहीत. सार्वजनिक शौचालय असावे, स्व.अभयसिंह महाराज शिष्यवृत्ती बंद केली. त्यांच्या नावाची ऍलर्जी आहे का? अशी विचारणा करून लक्ष वेधून घेतले.
अंदाजपत्रकातील त्रुटीचा प्रत्येक विभागातील अधिकार्‍यांकडून खुलासा हवा असा हट्ट लेवे आणि मोने यांनी धरला होता. आरोग्य विभागाचे अधिकारी नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. नवीन अधिकारी असलेले कागारे हे फलटणवरून आल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला. त्यांना पूर्ण माहिती घेवून सभागृहात या, असा टोला मोने यांनी लगावला. दरम्यान, सभागृहाच्या दुरुस्तीच्या माहितीवरून अभियंता भाऊ पाटील यांनी मोठ्या आवाजात सभागृह हे पालिकेच्या इमारतीच्या बाहेर नाही, असे सांगत असताना अ‍ॅड. बनकर यांनी त्यांना बोला, जोरात बोला असे फर्मान सोडले. त्यावर मोने यांनी भाऊ पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
अंदाजपत्रक समतोल : राजेशिर्के
 उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सभागृहापुढे 228 कोटी, 60 लाख, 96 हजार 48 रुपयांचे, 5 लाख 95 हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. हे अंदाजपत्रक समतोल आणि शहराचा विकास साधणारे असल्याचा दावा त्यांनी केला. या अंदाजपत्रकावर नगरविकास आघाडीचे अशोक मोने आणि भाजपाच्या सिद्धी पवार यांनी उपसूचना मांडल्या होत्या. त्यावर तब्बल पावणे तीन तास खल होवून मतदान झाले. उपसूचनेच्या बाजूने 11 मते तर सूचनेच्या बाजूने 19 मते पडून संख्याबळावर अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. यामध्ये कै.श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराज शिष्यवृत्ती योजनेची तरतूद केली नाही. पत्रकारांना उत्कृष्ट लिखाणासाठी पुरस्कारासाठी 2 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शहर वायफाय होणार आहे. मराठी भाषा पंधरवड्यासाठी 3 लाखाची तर कर्जाच्या परतफेडीसाठी 40  लाखाची तरतूद करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकात प्रामुख्याने सातारकरांसाठी विशेष बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कर्मचारी वैद्यकीय विम्यासाठी 20 लाख, शिवजयंती उत्सवासाठी 8 लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 5 लाख, शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद पुरस्कारासाठी 1 लाख, स्वच्छ सर्व्हेक्षण वॉर्ड स्पर्धेसाठी 35 लाख, पत्रकारांना पुरस्कार 2 लाख, पोहण्याच्या तलावाचे नूतनीकरण 25 लाख, शाहू कलामंदिराच्या दुरुस्तीसाठी 30 लाख, अजिंक्यतारा स्मृती उद्यानासाठी 15 लाख, सुधारित वाहतूक आराखड़्यासाठी 20 लाख, वॉटर ऑडिटसाठी 10 लाख, शाळा देखभाल(उर्दू) 60 लाख, हॉकर्स झोन तयार करण्यासाठी 10 लाख, पर्यटन विकासवाढीसाठी 10 लाख, आयुर्वेदिक गार्डनसाठी 15 लाख, ज्येष्ठ नागरिक भवन दुरुस्तीसाठी 5 लाख, जंतुनाशक खरेदीसाठी 1 कोटी 50 लाख, पोवई नाक्यावर सीसीटीव्ही बसवण्यासाठी 15 लाख, सातारा शहर वायफाय करण्यासाठी 10 लाख, पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 65 लाख, हरित सातारा अभियानासाठी 2 लाख, विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या महिलांना जिजाऊ पुरस्कार देण्यासाठी 10 लाख, नवीन भाजी मंडई विकसनासाठी 10 लाख, अशी 7 कोटी 53 लाखांची तरतूद करण्यात आली आहे तसेच जमेच्या बाजूमध्येही एकत्रित मालमत्ता कर 13 कोटी, पाणी कर 3 कोटी 50 लाख, थकीत घरपट्टीवरील व्याज 4 कोटी 20 लाख, अशी 21 कोटी 20 लाखांची वाढ दाखवण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: