Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खटावच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकार्‍यांना दंड
ऐक्य समूह
Monday, February 26, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: re1
माहिती न दिल्याने तीन हजारांच्या वसुलीचा आदेश
5औंध, दि. 25 : खटावचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी कर्तव्यसूची व दैनंदिनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी त्यांच्यावर तीन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. हा दंड वसूल करण्याचे आदेश सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्याची माहिती औंध येथील राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे यांनी दिली. यामुळेे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, दत्तात्रय जगदाळे यांनी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी व विस्तार अधिकारी यांच्या दैनंदिन कामकाजासंबंधीच्या डायरीची मागणी माहिती अधिकारांतर्गत केली होती. मात्र, ही माहिती जनहिताशी संबंधित नसून वैयक्तिक असल्याचे कारण सांगून ती देण्याचे त्यांनी नाकारले होते. याविरोधात जगदाळे यांनी अपील केले होते. राज्य माहिती आयोगापुढे झालेल्या सुनावणीत अनिस नायकवडी यांनी सादर केलेला लेखी खुलासा विचारात घेता कर्तव्यसूची व डायरी ही वैयक्तिक नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. कोणताही  ठोस पुरावा नायकवडी यांना देता न आल्याने माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 7 (1) चे उल्लंघन केल्या प्रकरणी व कलम 20 (1) अन्वये राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी नायकवडी यांच्यावर तीन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नायकवडी यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जगदाळे यांनी दिली. नायकवडी हे सध्या खानापूर (विटा, जि. सांगली) येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: