Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

मालिका विजयासाठी आज अटीतटीची झुंज
ऐक्य समूह
Saturday, February 24, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: sp1
5केपटाऊन, दि. 23 (वृत्तसंस्था) : यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दीर्घ क्रिकेट द्वंद्वाचे वर्तुळ उद्या पूर्ण होत असून केपटाऊन येथे दोन संघांमध्ये तिसरा व मालिकेतील शेवटचा ट्वेंटी-20 सामना होत आहे. आधीच्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकल्याने ही मालिका बरोबरीत आली आहे. आता उद्याच्या सामन्यात विजय मिळवून एकदिवसीय पाठोपाठ टी-20 मालिकाही खिशात टाकण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे. मात्र, त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लढाऊ बाण्याचा अडसर आहे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याची सुरुवात केपटाऊन येथे पहिल्या कसोटी सामन्याने झाली होती. आता या दौर्‍यातील आणि टी-20 मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊन येथील न्यूलँडस् मैदानावर होत असल्याने एक वर्तुळ पूर्ण होत आहे. कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने सहज गमावल्यावर तिसरी कसोटी जिंकून भारताने ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले होते. त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने यजमानांचा 5-1 अशा फरकाने फडशा पाडत दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी 25 वर्षांनी केली होती. या मालिकेतील बहारदार कामगिरीमुळे स्फुरण चढलेल्या भारतीय संघाने टी-20 मालिकेतील पहिला सामना भुवनेश्‍वरच्या पाच बळींच्या जोरावर 28 धावांनी जिंकला. मात्र, दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झुंजार खेळ करत विजय मिळवला. एकदिवसीय मालिकेत भारताच्या युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्या लेगस्पिनसमोर यजमान फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली होती. मात्र, टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये दवामुळे युजवेंद्रला चेंडूवर पकड मिळवणे कठीण जात होते. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याची जोरदार धुलाई केली. त्यामुळे त्यांना दुसरा सामना जिंकता आला.
आता तिसरा सामना केपटाऊन येथील न्यूलँडस् मैदानावर होत असून येथील खेळपट्टीवर फिरकीपटू अधिक प्रभावी ठरतील, असा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही संघ प्रमुख दोन फिरकीपटूंना खेळवण्याची शक्यता आहे. भारताने दोन्ही टी-20 सामन्यात फक्त युजवेंद्रला संधी देऊन कुलदीपला वगळले होते. मात्र, उद्याच्या सामन्यात हे दोघेही खेळतील, अशी चिन्हे आहेत. दक्षिण आफ्रिकाही तबरेज शम्सी व अ‍ॅरोन फँगिसो या दोन्ही प्रमुख फिरकीपटूंना खेळवण्याची शक्यता आहे. पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली व शिखर धवन यांनी जोरदार फटकेबाजी केली होती तर दुसर्‍या सामन्यात मनीष पांडे व महेंद्रसिंग धोनी यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. म्हणजेच कधी अव्वल फळीतील तर कधी मधल्या फळीतील फलंदाज यशस्वी ठरले आहेत. फलंदाजीचे युनिट म्हणून भारताचे सर्व फलंदाज एकाच वेळी चमकल्याचे उदाहरण या संपूर्ण दौर्‍यात पहायला मिळालेले नाही. भारताचे बलस्थान असलेली फलंदाजी पूर्णपणे बहरात न आल्याचा फटका टी-20 मध्ये बसला आहे. ही कसर भरून काढण्याची संधी उद्याच्या सामन्यात आहे. हा सामना जिंकून दौर्‍याचा शेवट दिमाखदार करण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, मनीष पांडे, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्‍वरकुमार, जसप्रीत बूमराह, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका : जेपी ड्युमिनी (कर्णधार), जॉन-जॉन स्मटस्, फरहान बेहरादिन, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, हेन्रिच क्लासन, ख्रिस्टियन जाँकर, ख्रिस मॉरिस, डेन पॅटरसन, अ‍ॅरोन फँगिसो, अँडिल फेलुक्वायो, तबरेझ शम्सी, ज्युनिअर डाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: