Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मलकापुरात तीन ठिकाणी घरफोड्या
ऐक्य समूह
Friday, February 23, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 22 : कोयना वसाहतीतील घरफोड्यांच्या घटना ताज्या असतानाच मलकापुरातील शास्त्रीनगरमध्ये बुधवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन बंगले फोडले. चोरट्यांनी जवळपास एक तोळे सोन्या-चांदीचे दागिने, वस्तू व एलइडी टीव्ही चोरून नेले.
याबाबत माहिती अशी, मलकापूर येथील शास्त्रीनगरमधील रानडे हॉस्पिटलजवळ राहणारे अधिकराव परशुराम कदम हे दि. 19 रोजी प्रशिक्षणानिमित्त इंदूर येथे गेले होते तर त्यांची पत्नी सुरेखा या कामानिमित्त बेलदरे येथे गेल्या होत्या. बुधवारी रात्री बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडला. त्यातील सुमारे 15 हजाराच्या चांदीच्या वस्तू व हॉलमधील 30 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरट्यांनी लंपास केला. बंगल्यामधील इतर साहित्य विस्कटले. त्यानंतर अधिकराव यांचे शेजारीच राहणारे बंधू शांताराम कदम यांच्या बंगल्याचा दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. याच परिसरात प्रशांत मच्छिंद्र शिंदे यांचा गीताभवन हा बंगला असून शिंदे कुटुंबीय नोकरीनिमित्त मुंबईत राहतात. त्यांची आई मनीषा या शास्त्रीनगर येथील बंगल्यात राहतात. त्या आठ दिवसांपूर्वी मुलाकडे मुंबईला गेल्या होत्या. या बंगल्याच्या दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील लहान अंगठी, तीन घड्याळे, दोन मूर्ती, चांदीच्या वस्तू, दोन हजार रुपये रोख व नवीन 10 ड्रेस, असा ऐवज लंपास केला. तेथून जवळच असलेल्या शिरसट यांचा बंगला फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शास्त्रीनगर येथे शिवाजीनगर 1, 2 आणि  विश्रामनगर अशा तीन अंगणवाड्या एकाच ठिकाणी असून बुधवारी रात्री अंगणवाडीच्या दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 2 हजार 800 रुपये ठेवलेला डबा लंपास केला. हे पैसे लोकसहभागातून जमा करण्यात आले होते. कोयना वसाहतीमधील घरफोड्या ताज्या असतानाच मलकापुरातही घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: