Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हौदात पडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना जीवदान
ऐक्य समूह
Friday, February 23, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: re1
5पाटण, दि. 22 : कोयना भागातील रासाटी (आंबेघर) गावानजीक धनगरवाड्याजवळील खाजगी क्षेत्रातील कोरड्या हौदात बिबट्याचा दोन वर्षांचा बछडा पडल्याची घटना घडली. हौदात पाणी नसल्याने बछड्याचा जीव वाचला. ही माहिती वन्यजीव विभागाला समजल्यानंतर अधिकारी, कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बछड्याला पिंजर्‍याच्या सहाय्याने बाहेर काढले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, आठवड्यापूर्वी याच हौदात बिबट्याचा बछडा पडला होता. एकाच आठवड्यात दोन बछड्यांना वाचविण्यात यश आले आहे.
कोयना भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर  झोनमध्ये येणार्‍या रासाटी (आंबेघर) गावानजीक धनगरवाड्याजवळच्या खाजगी मालकीच्या हौदात पाणी पिण्याच्या उद्देशाने आलेला बिबट्याचा दोन वर्षांचा बछडा गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास पडला. याबाबतची माहिती स्थानिकांनी हेळवाक येथे वन्यजीव विभागाला दिल्यानंतर वनरक्षक अमृत पन्हाळे, वनक्षेत्रपाल अमित भोसले, वनपाल कोळणे, जाधवर, कोयनेचे वनपाल आनंद सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बछड्याला पिंजर्‍याच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. बछड्याच्या पायाला जखम झाल्याने पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यावर उपचार केले. या बछड्याला पिंजर्‍यात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. बछड्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी बिबट्याच्या बछड्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि. 16) याच हौदात बिबट्याचा आणखी एक बछडा पडला होता. हेळवाक येथील वन्यजीव विभागाच्या पथकाने त्याला शिडी टाकून बाहेर काढून जंगलात सोडले होते. आठवडाभरात दोन वेळा एकाच हौदात बिबट्याचे बछडे पडल्याने हा हौद वन्यप्राण्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे. तो इतरत्र हलवावा, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता हा हौद खाजगी क्षेत्रात येत असून या क्षेत्रात आंब्याची बाग असल्याचे समजते.
दरम्यान, 23 जानेवारी रोजी मांजराच्या मागे लागलेल्या बिबट्याचा या हौदापासून हाकेच्या अंतरावरच असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या घटनांचा विचार करता वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याचा शोध घेत मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वन्यजीव विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: