Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अस्मिता योजनेच्या मोबाईल अ‍ॅपचा शुभारंभ
ऐक्य समूह
Friday, February 23, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: mn5
मुलींना मिळणार पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकीन
5मुंबई, दि. 22 (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांमध्ये आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. या योजनेचा लोगो, योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले मोबाईल अ‍ॅप आणि डिजिटल अस्मिता कार्ड यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. येत्या महिला दिनापासून म्हणजे 8 मार्चपासून अस्मिता योजना सुरू होत आहे.
अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना 240 मिमीच्या आठ पॅडचे एक पाकीट पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी किशोरवयीन मुलींची ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करून त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलगी बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकीन खरेदी करतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण सात लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहेत. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पाच रुपयांप्रमाणे विक्री केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट 15.20 रुपयांप्रमाणे अनुदान शासन बचत गटांना देणार आहे. किशोरवयीन मुलींना वर्षभरात 13 पाकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महिलांनाही माफक दरात सॅनिटरी पॅड
अस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिलांना आठ पॅडचे पाकीट 24 रुपयांना तर 280 मिमीच्या आठ पॅडचे एक पाकीट 29 रुपयांना उपलब्ध होणार आहे. वितरकांकडून बचत गट सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट खरेदी करून परस्पर विक्री करणार आहेत.
प्रभावी अंमलबजावणी करू : पंकजा मुंडे
या संदर्भात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील फक्त 17 टक्के महिला मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. उर्वरित महिलांना सॅनिटरी नॅपकीनच्या वापराअभावी आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. मुली आणि महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. 
 यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजना जाहीर करण्यात आली आहे. मोबाईल अ‍ॅप, डिजिटल अस्मिता कार्ड यांच्या माध्यमातून या योजनेत पूर्ण पारदर्शकता राखली जाणार असून योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: