Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माण तालुक्यातील 74 छावणीचालकांवर गुन्हे
ऐक्य समूह
Wednesday, February 21, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: re3
अनियमिततेचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाचे आदेश
5पळशी, दि 20 : माण तालुक्यात 2013 साली पडलेल्या दुष्काळात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या. त्या छावण्यांमध्ये जनावरांना अपुरा चारा देणे, अनियमित पेंड देणे, ओला चारा न पुरवणे असा ठपका ठेवून तालुक्यातील 74 छावणीचालकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने म्हसवड व दहिवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी सर्कल व तलाठ्यांची फिर्याद नोंदवून घेतली जात होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे शेतकर्‍यांमधून स्वागत होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, 2013 ते 2015 या दीड वर्षाच्या कालावधीत माण तालुक्यात चारा व पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात होती. हजारो कुटुंबांनी जनावरांसह छावण्यांमध्येच आपला संसार उभा केला होता. दीड वर्षात आलेले दिवाळी, गुढीपाडवा, बेंदूर असे सर्व सण, उत्सव शेकडो माणवासीयांनी छावण्यांमध्येच साजरे केले होते. या काळात सरकारकडून महसूल विभागाकडे जनावरांसाठी आलेला ओला व सुका चारा, पेंड, मिनरल मिक्श्‍चर व पाण्याचे अनुदान वेळेत न देणे, एखाद्या दिवशी चारावाटपच न करणे याबाबत  माणमधील एकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून महाराष्ट्रातील सर्व छावणीचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत. त्यानुसार माण तालुक्यातील 74 छावणीचालकांवर म्हसवड व दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
दोनच छावण्यांना कारवाईतून वगळले
74 छावण्यांपैकी आगासवाडी व म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनची छावणी, या दोन छावण्या सोडून अन्य छावण्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शेतकर्‍यांनी स्वागत केले आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: