Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

टीम इंडियाचे टी-20 मालिका विजयाचे लक्ष्य
ऐक्य समूह
Wednesday, February 21, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: sp1
‘रनमशीन’ विराटला खुणावतोय आणखी एक विक्रम
5सेंच्युरियन, दि. 20 (वृत्तसंस्था) : एकदिवसीय मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिकेला चारीमुंड्या चीत केल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात चुरशीच्या झुंजीत 28 धावांनी विजय मिळवला. आता उद्या सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर होणारा दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांची ही मालिकाही खिशात टाकण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एक विक्रम खुणावत आहे. एकाच दौर्‍यात 974 धावा करण्याच्या सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्याची संधी विराटला उर्वरित दोन टी-20 सामन्यांमध्ये आहे. त्यासाठी त्याला अजून 104 धावांची गरज आहे. मात्र, एकाच दौर्‍यात एक हजारपेक्षा जास्त धावा करणार्‍या सर विव्ह रिचर्डस् यांच्या पंक्तीत जाऊन बसण्यासाठी विराटला अजून 130 धावा करणे आवश्यक आहे.
एकदिवसीय मालिका 5-1 अशी मोठ्या फरकाने खिशात घातल्यानंतर पहिल्या टी-20 सामन्यात शिखर धवनची फटकेबाजी आणि भुवनेश्‍वरकुमारच्या पाच बळींच्या जोरावर भारताने अटीतटीच्या लढतीत 28 धावांनी बाजी मारली. आता उद्याचा सामना जिंकून ही मालिकाही खिशात घालण्याची संधी टीम इंडियाला आहे. या मालिकेतील 3-0 विजयाने भारताला एकदिवसीय पाठोपाठ आयसीसी टी-20 रँकिंगमध्येही पहिल्या स्थानावर झेप घेण्याची संधी आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळताना विराटला किरकोळ दुखापत झाली होती. मात्र, त्यावर मात करून तो सर्व एकदिवसीय सामने आणि पहिल्या टी-20 सामन्यातही खेळला होता. आता उद्याच्या सामन्यापर्यंतही तो फिट राहील, असे सांगण्यात आले आहे. मात्र, तो उद्या खेळू शकला नाही तर त्याची जागा लोकेश राहुल घेईल.
एकदिवसीय मालिकेत युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांची लेगस्पिन गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेसाठी कर्दनकाळ ठरली होती. मात्र, पहिल्या टी-20 सामन्यात युजवेंद्रची चांगलीच धुलाई झाली. शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये भुवनेश्‍वरकुमारच्या अफलातून गोलंदाजीमुळे भारताने विजय मिळवला असला तरी इतर गोलंदाजांनी आपली कामगिरी उंचावणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा, शिखर धवन व विराट कोहली हे वरच्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करत असताना मधल्या फळीतील फलंदाजांनी योगदान देणे गरजेचे आहे. महेंद्रसिंग धोनी वरच्या स्थानावर खेळण्यास नाखूश असल्याने मनीष पांडे, सुरेश रैना व हार्दिक पांड्या यांनी अधिक जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. दुसर्‍या बाजूला पहिल्या टी-20 सामन्यात चांगली झुंज देऊनही दक्षिण आफ्रिकेची पाठ भिंतीला लागली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्‍वास मिळवणे त्यांच्यासाठी कठीण आहे.
कोहलीला विक्रम खुणावतोय
या दौर्‍यात कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत. द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक (साडेपाचशे) धावा करणारा तो क्रिकेट विश्‍वातील एकमेव फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच मालिकेत 491 धावा केल्या होत्या. कोहलीला आता आणखी एक विक्रम खुणावत आहेे. एकाच दौर्‍यात 974 धावा करण्याचा सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला अजून 104 धावांची गरज आहे. ब्रॅडमन यांनी 1930 साली इंग्लंडविरुद्ध पाच कसोटींमध्ये 974 धावा केल्या होत्या. कोहलीने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत कसोटी व एकदिवसीय मालिकेत 13 डावांमध्ये मिळून 870 धावा केल्या आहेत. मात्र, एकाच दौर्‍यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या सर विव्ह रिचर्डस् यांच्या नावावर आहे. रिचर्डस् यांनी 1976 साली इंग्लंड दौर्‍यात चार कसोटी व तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये मिळून 1045 धावा केल्या होत्या. एकाच दौर्‍यात एक हजार धावा पूर्ण करून रिचर्डस् यांच्या पंक्तीत जाऊन बसण्यासाठी कोहलीला अजून 130 धावांची गरज आहे.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, मनीष पांडे, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्‍वरकुमार, जसप्रीत बूमराह, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका : जेपी ड्युमिनी (कर्णधार), जॉन-जॉन स्मटस्, फरहान बेहरादिन, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, हेन्रिच क्लासन, ख्रिस्टियन जाँकर, ख्रिस मॉरिस, डेन पॅटरसन, अ‍ॅरोन फँगिसो, अँडिल फेलुक्वायो, तबरेझ शम्सी, ज्युनिअर डाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: