Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

कोहलीच्या शतकाने द. आफ्रिकेचा धुव्वा
ऐक्य समूह
Saturday, February 17, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: sp1
भारताची आफ्रिकेवर 8 गडी राखून मात; शार्दुल ठाकूरचे 4 बळी
5सेंच्युरियन, दि. 16 (वृत्तसंस्था) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवत ही मालिका 5-1 ने जिंकली.
तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने आजच्या सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. विराटचे या सामन्यात आपले तिसरे आणि एक दिवसीय कारकिर्दीतील 35 वे शतक आहे. त्याने शिखर धवन 18 (34) आणि अजिंक्य रहाणेसोबत 34 (50) महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. 
एकदिवसीय मालिकेत जबरदस्त कामगिरी करणार्‍या भारताच्या गोलंदाजांनी शेवटच्या सामन्यातही यजमान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.  मुंबईकर शार्दुल ठाकूरने घेतलेले चार बळी आणि जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 204 धावांत गुंडाळले.
शार्दुल ठाकूरच्या भेदक मार्‍यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अखेरच्या सामन्यातही पुरता कोलमडला. शार्दुलने  सामन्यात 4 बळी घेत कर्णधार विराट कोहलीचा विश्‍वास सार्थ ठरवला. यजुवेंद्र चहल आणि बुमराने प्रत्येकी दोन आणि हार्दिक पांड्या व कुलदीपने  प्रत्येकी एक गडी बाद केले आहेत. 
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेला 204 धावांवर रोखण्यात यश मिळवले. आफ्रिकेला जखडून ठेवण्यात शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली. शार्दुल ठाकूरने आफ्रिकेच्या हाशिम आमला आणि एडन मार्कम या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडले. अडचणीत सापडलेल्या आफ्रिका संघाला एबी डिव्हीलियर्स आणि खाया झोंडोच्या भागीदारीने तारले. या दोघांमध्ये तिसर्‍या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र यजुवेंद्र चहल याने एबीचा त्रिफळा उडवला आणि ही जोडी फोडली. त्यानंतर आफ्रिकन संघाचा एकही फलंदाज भारताच्या आक्रमणापुढे तग धरू शकला नाही. खाया झोंडोने एका बाजूने झुंज सुरू ठेवत आंतरराष्ट्रीय सामन्यातले पहिले अर्धशतक झळकावले. भारताने मालिका आधीच खिशात घातली आहे. आजच्या सामन्यात भुवनेश्‍वर कुमारला विश्रांती देण्यात आली. 
204 धावांचे लक्ष्य घेवून मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात सावधपणे केली. रोहित शर्मा 15 धावा काढून बाद झाला. त्यानंतर शिखर धवनने विराट कोहलीच्या साथीने धावफलक हलता ठेवला. परंतु खाया झोंडोच्या गोलंदाजीवर 18 धावा काढून तोही परतला. त्यानंतर विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी ही धावसंख्या 32.1 षटकात
2 गड्यांच्या मोबदल्यात 206 धावा करून पार केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: