Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंत्रालयासमोर आणखी एका वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न
ऐक्य समूह
Saturday, February 17, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: mn5
5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : धुळ्यातील वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच मंत्रालयासमोर आज आणखी एका वृद्ध महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या वृद्धेला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. शकूबाई कारभारी झाल्टे (60) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधील वडगाव पंगू गावातील आहेत.
कुटुंबातील जमिनीच्या वाटणीचा वाद मिटवण्यासाठी शकूबाई सतत मंत्रालयाचे खेटे मारत होत्या. मात्र अनेक अधिकार्‍यांकडे पत्रव्यवहार करूनही काम होत नसल्याने त्याला कंटाळून आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांनी मंत्रालयाजवळील रस्त्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता. शकूबाई यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे एका महिला कॉन्स्टेबललाही तैनात करण्यात आले आहे. शकूबाई यांचे सासरे भिका लक्ष्मण झाल्टे यांची 3 हेक्टर 57 गुंठे जमीन असून या जमिनीच्या वाटणीवरून 1947 पासून चुलत कुटुंबाशी वाद सुरू आहे. 7/12 उतार्‍यावर दुसर्‍या गटातील सुनील वाल्मीकी झाल्टे व अन्य 7 जणांची नावे आहेत. हा वाद सरकार दफ्तरी गेला असता प्रांताधिकार्‍यांनी शकूबाई यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर त्यांना जमिनीचा ताबा देण्यासाठी पोलीस फौजफाटाही पाठवण्यात आला होता. मात्र, सुनील यांच्या गटाने उपजिल्हाधिकार्‍यांकडे आव्हान दिले असता त्यांनी
प्रांताधिकार्‍यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे या जमिनीचा वाद भिजत पडला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: