Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

अखियोंसे गोली मारे...
vasudeo kulkarni
Thursday, February 15, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lolak1
 
भारतीय समाजात 40-50 वर्षापूर्वी युवक-युवतींनी खुलेपणाने परस्परांशी बोलणेही अवघड होते. शाळा-महाविद्यालयात तर विद्यार्थी-विद्यार्थिनी परस्परांशी  बोलायचे धाडसही करीत नसत. सख्याहरींच्या टोळक्यांनी चौकात उभे राहून, युवतींची छेड-छाड, शिट्या मारायच्या, सुंदर युवतीचे लक्ष वेधत युवकच डोळे मारत. परस्परांवरचे प्रेमही अव्यक्त राहात असे. चोरून परस्परांना  प्रेमपत्र लिहिणे आणि दोघांच्याही परिचयातल्या मित्र-मैत्रिणीकडून अशा चिठ्ठ्यांची देवाणघेवाण तीही गुपचूपच होत असे. चोरून प्रेम करायचा तो जमाना अलीकडे संपला. मुक्त आणि उदारमतवादी पाश्‍चात्य संस्कृती देशाच्या शहरी-ग्रामीण भागापर्यंत रुजली-बोकाळली. ‘खुल्लम खुल्ला’ प्रेमाचा जमाना सुरू झाला. स्मार्टफोनच्या नव्या सुविधेने तर व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकद्वारे प्रेमपत्रच काय, पण परस्परांच्या छब्यांचीही देवाणघेवाण व्हायला लागली. शाळेतल्या कोवळ्या वयातल्या मुला-मुलींच्यापर्यंत ‘प्रेमरोगा’चा झपाट्याने प्रसार झाला. शाळा, महाविद्यालयात प्रेमिकांच्या प्रेमाला बहर यायला लागला. मुली-युवतीच प्रेमाच्या प्रकरणात आक्रमक व्हायला लागल्या. पूर्वी प्रेमी युगुलाच्या जोड्यात प्रेमिकच आपल्या प्रियेला डोळा मारून, प्रेमाचे अदृश्य बाण मारत असे. आता मात्र प्रेमी युवतीच खुलेपणानेच काय, पण शाळेच्या वर्गातही आपल्या प्रियकराला डोळा मारत प्रेमचाळे करण्याइतक्या धाडसी झाल्या आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’, हा पाश्‍चात्य संस्कृतीतला उथळपणे प्रेम व्यक्त करायचा दिवस. अलीकडे भारतातही या उथळ प्रेमदिवसाला बहर आल्यानेच, आपल्याला आवडणार्‍या प्रियकर-प्रेयसीला गुलाबाची फुले, भेटवस्तू  देणार्‍यांची झुंबड उडते. यावर्षीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आदल्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सामाजिक माध्यमावरून भर वर्गात आपल्या मित्राला डोळा मारून, अदृश्य प्रेमबाणाने घायाळ करणार्‍या एका युवतीचे चित्र आणि चित्रफीत प्रसारित झाली आणि अवघ्या 24 तासाच्या आत देशभर ही धाडसी युवती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मल्याळी ‘ओरु उदार लव्ह’ या आणखी महिनाभराने प्रदर्शित होणार्‍या चित्रपटातल्या गाण्याचे दृश्य सामाजिक माध्यमावरून प्रसारित झाले आणि देशातल्या युवकांना अक्षरश: त्या सुंदर युवतीच्या डोळा मारायच्या अदाकारीने घायाळ केले आहे. किशोरी वयातल्या युवक-युवतीच्या प्रेमाच्या कथेवर आधारलेल्या या चित्रपटातल्या या गाण्याच्या दृश्यात अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही वर्गात बसलेल्या आपल्या प्रियकराला म्हणजे मोहंमद रोशनला डोळा मारून प्रेमाचा  बाण मारते. प्रिय व्यक्तीला चोरून पाहता पाहता परस्परांची नजरानजर होताच, प्रियेच्या चेहर्‍यावर उमटणारी लाली आणि गोरामोरा होणारा चेहरा, असा अभिनय प्रियाने उत्कटपणे रंगवल्यानेच, ही चित्रफित सध्या देशभर गाजते आणि वाजते आहे. इन्स्टाग्राम, व्हॉटस्अ‍ॅप आणि ट्विटरद्वारे ही ध्वनिचित्रफित अवघ्या चोवीस तासात 20 कोटी रसिकांपर्यंत पोहोचली. प्रचंड लोकप्रियता मिळालेली प्रिया एका रात्रीत अभिनेत्री झाली. तिचा अभिनय आवडल्याचे लाखो संदेश तिला स्मार्टफोनद्वारे मिळाले आहेत. अवघ्या 18 वर्षे वयाची ही नवोदित अभिनेत्री केरळ राज्यातल्या त्रिशूर शहरातल्या मुलींच्या महाविद्यालयात शिकते आहे. ती उत्कृष्ट गायक आणि नर्तिकाही आहे. तिने अभिनय केलेला हा पहिलाच चित्रपट. नशिबाने तिला अशी साथ दिली आणि ती देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आता तिला मल्याळीबरोबरच तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटातल्या भूमिकेची आमंत्रणेही मिळायला लागली आहेत. नेत्रबाणाद्वारे हृदयाचा अचूक वेध घेणार्‍या या गाण्याने आणि वर्गातल्या प्रेमदृश्याने लाखो नागरिकांना आपण शाळकरी वयात केलेल्या एकतर्फी-चोरून केलेल्या प्रेमाची आठवण नक्की येईल!
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: