Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

गरज आत्मपरीक्षणाची
ऐक्य समूह
Thursday, February 15, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: st1
मागील काही वर्षांमध्ये ‘ग्लोबल वॉर्मिंगची’ संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. तापमानबदलाचे दुष्परिणाम अवघ्या जगावर दिसून येत आहेत. कुठे तापमानवाढीचा कहर आहे तर कुठे नीचांकी तापमानाची लाट आहे. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन जागतिक पातळीवर सर्वच देशांकडून तापमानवाढ रोखण्याचे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. परंतु भांडवलशाही जोपसणारे देश यात योगदान देणार का, हा खरा प्रश्‍न आहे
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या परिषदेमध्ये पंतप्रधानांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी जागतिक तापमानवाढीच्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. भारतच नव्हे तर सगळ्या जगावर तापमानबदलाचे संकट दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर तापमान बदलासाठी प्रत्येक देशाने पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय मंचावरून पर्यावरणाविषयी काळजी व्यक्त केली जाते. त्यावर उपाययोजनांची अंमलबजावणी मात्र शून्य असते. आजकाल प्रत्येक देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या स्पर्धेमध्ये धावत आहे. जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या अधाशीपणापायी पर्यावरणावर काय लादले जातंय याची दखल कोणताही देश घेताना दिसून येत नाही. जगभरात जवळपास प्रत्येक देशाला तापमानवाढीचा फटका बसला आहे. अमेरिकेतील नीचांकी तापमानामुळे गोठलेला नायगारा हे तापमानवाढीचे भीषण स्वरूप आहे. असे असले तरी भांडवलवादी अमेरिका मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा घेतलेल्या उद्दाम निर्णयाची परिणीती मात्र सगळ्या जगाला भोगावी लागेल हे सत्य आहे. अमेरिकेत नीचांकी तापमान असताना दक्षिण ध्रुवाजवळ ऑस्ट्रेलियात ‘सिडनी’ इथे तापमानाने 48 अंश ते 50 अंश सेल्सियसचा उच्चांक केला. मध्य पूर्वेत मुसळधार पावसामुळे महापूर आला आणि सहारा वाळवंटात बर्फाची चादर पसरली. हजारो, लाखो वर्षांमध्ये न घडणार्‍या अशा घटना पृथ्वीवर जीवनाची मृत्युघंटा वाजवत आहेत. पुढील धोक्याची सूचना देत आहेत.
उष्णतेची लाट
गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमधील उष्णतेच्या लाटांमधे भारतात तमिळनाडूत तर जगात इतरत्र लाखो मृत पक्ष्यांचा खच पडला. ओखी चक्रीवादळाने पश्‍चिम किनारपट्टीला समांतर वाटचाल करत लष्करी संचलनाप्रमाणे भारताला इशारा दिला. या घटनांमागे वाढत्या तापमानाचं समान सूत्र आहे. पक्ष्यांना याची जाणीव झाली तरी राजकीय पक्षांना अजून ती होत नाही. ते आर्थिक विकास आणि वृद्धीच्या, सतत विनाश घडवणार्‍या पाश्‍चात्य रूढ प्रतिमानाला धरून आहेत. ‘चलन’ हे विनिमयाचे फक्त साधन आहे. ज्याचा विनिमय होतो ती गोष्ट पृथ्वीच्या घडणीचा आणि जीवसृष्टीचा नाश करून मिळवली जाते. हा विकास पृथ्वीची जडणघडण व जैविक विविधता नष्ट करत आहे. तो शाश्‍वत असूच शकत नाही. जीडीपीच्या दरातील वाढीवर आधारित अर्थव्यवस्थेमुळे  जीवावरण, वातावरण, जलावरण आणि भूआवरणात दर दिवशी अनिष्ट जीवनविरोधी बदल होत आहेत. मर्यादित पृथ्वीवर अमर्याद अर्थव्यवस्था राबवली जाऊ शकत नाही. या अर्थव्यवस्थेच्या बधिरपणापायी धर्मा पाटलांसारख्या शेतकर्‍यांचे बळी जात आहेत. पण कोट्यवधी रुपयांची भरपाई मिळाली तरी कोणताही गेलेला जीव परत येऊ शकत नाही.
प्रदूषणाने संहार
पृथ्वी हीच अभियंता आणि आर्किटेक्ट आहे. तिची अभियांत्रिकी जीवन देण्यासाठी आहे. मात्र सिमेंट स्टीलची धरणे, रस्ते, टॉवर्स, मोटार, विमान, वीज इत्यादींची निर्मिती करणारी, आधुनिक अभियांत्रिकी नोकरी देणारी परंतु नोकरी करणार्‍या मनुष्यप्राण्याला संपुष्टात आणणारी आहे. यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे 27 जण मृत्युमुखी पडले. याची चौकशी करणार्‍या समितीने योग्य काळजी न घेतल्याबद्दल शेतकर्‍यांनाच दोष दिला. त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली. बहुतांश शेतकरीदेखील शेतीत रसायनं वापरण्याची कोणतीही गरज नाही, हे समजून घेत नाहीत. 1984 मधे युनियन कार्बाईडच्या वायुगळतीमुळे भोपा ळला  नरसंहार झाला. पण असा भयंकर विषारी वायू ज्या कीटकनाशकांच्या निर्मितीत वापरला जातो ती कीटकनाशक किती जीवघेणी असतील असा विचार शेतकरी, शहरी आणि ग्रामीण ग्राहक करत नाहीत. निसर्गासारखी प्रतिकृती निर्माण करण्याचा हव्यास मानवाला विकृतीकडेच नेत आहे. दावोसच्या पाश्‍वर्र्भूमीवर रघुराम राजन यांनी देशाची अर्थव्यवस्था एका छोट्या कंपूच्या हाती गेल्याची रास्त टीका केली. संवेदनशील आणि उमद्या स्वभावाचे रघुराम राजन यांचा अर्थव्यवस्थेला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न होता. पण हा ‘मानव’ शेवटी आधुनिक यंत्र-तंत्र वापरणारा आणि  अर्थव्यवस्थेमुळे संमोहित झालेल्या शहरी मानसिकतेचा असतो. पृथ्वीवरील कोट्यवधी जीवजातींपैकी एक जीवजात या अर्थाने मानव आणि जीवसृष्टीच्या दृष्टीने सजीव म्हणून विचार केला जात नाही. खरे तर मानवासाठी विकास म्हणजे पायाभूत संरचनेत वाढ करणे, विकासदर आठ टक्क्यांवर नेणे, रस्ते आणि मोटारनिर्मितीसारख्या क्षेत्रातून रोजगारासाठी मोठी गुंतवणूक करणे इतपतच मर्यादित आहे.
विकासरूपी मृत्यूचा सापळा
रोजगारनिर्मिती करण्याच्या कल्पनेने सर्वांना पछाडले आहे. पृथ्वीवर मानव सोडून इतर कोणताही सजीव रोजगार करत नाही.  पृथ्वीवर ‘स्वयंपूर्णता’ ही सजिवांना मिळालेली अमूल्य देणगी आहे. आधुनिक मानवाने ती स्वतःच गमावली. राजन म्हणतात, हवामानबदल ही पाश्‍चात्य अर्थव्यवस्थेपुढील, देशांपुढील समस्या आहे. अर्थात ती केवळ अर्थव्यवस्थेपुढील समस्या नसून अस्तित्वापुढील समस्या आहे, ती मानवजातीपुढील समस्या आहे. आर्थिक संकल्पना आणि वास्तव याबाबत अर्थशास्त्रज्ञांनी दुर्लक्ष करणं यापुढे चालणार नाही. पण खुद्द राजनसारख्यांचेही तापमानवाढीच्या वेगाकडे दुर्लक्ष होत आहे. नेते, उद्योगपती, बँकर, नोकरशहा, अभियंते अशा मानवी सरकारांच्याही वर पृथ्वीचे वा निसर्गाचे एक सरकार आहे आणि त्याच्या दृष्टीने औद्योगीकरण, शहरीकरण आणि अर्थव्यवस्था हीच जीवनासाठी समस्या आहे, हे लक्षात घ्यावे. लोकशाही आणि शोषणमुक्तीची मानवी संकल्पना अपुरी होती. त्यात फक्त मानवी व्यवस्थेच्या मर्यादित परिघात विचार केला जाणे हा मानवजातीकडून घडलेला अक्षम्य अपराध आहे. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दर वर्षी होणारी एक पंचमांश अंश सेल्सियसची वाढ पाहता फक्त पुढील पाच वर्षांमध्ये उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत दोन अंश सेल्सियसची वाढ होऊन मानवजात वाचवण्यासाठी ठेवलेले पॅरिस कराराचे उद्दिष्ट ओलांडले जाईल. बॉन परिषदेत  मांडलेल्या  जागतिक हवामान संघटनेच्या अभ्यासाप्रमाणे  तापमान किमान 50 वर्षं वाढत राहणार आहे. याचा अर्थ या शतकात मानवजात व जीवसृष्टीचे पृथ्वीवरून उच्चाटन होईल, अशी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना केवळ भ्रमिष्ट किंवा अज्ञानी माणसेच अर्थव्यवस्थेत वाढ करण्याच्या गोष्टी करू शकतात. रूढ अर्थाने ती किती बुद्धिवान आहेत याला काही महत्त्व नाही. दावोसपेक्षा बॉनची परिषद काय म्हणते हे महत्त्वाचं आहे. ‘बिल गेट्स’सारखा उद्योजक कार्बन उत्सर्जन न करणारं तंत्रज्ञान आणि ऊर्जास्त्रोतांच्या संशोधनासाठी शेकडो कोटी डॉलर खर्च करू इच्छितो. तंत्रज्ञान आणि पैसा मानवजातीला वाचवू शकणार नाही हे त्याला उमगत नाही. तो समस्येलाच उपाय समजत आहे. ही तंत्रज्ञान व यंत्रकेंद्री पाश्‍चात्य मानसिकता आहे. असा विचार करणार्‍यांनी लक्षात घ्यावे, की भौतिक विकास आणि जीवन एकाच वेळी असू शकणार नाही.
आज जगाने तातडीने 250 वर्षांपूर्वीच्या यंत्रपूर्व ऊर्जाविरहित जीवन-पद्धतीकडे जाण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी प्रकल्पांना सरळ विरोध करावा. कारण शेती आणि निसर्गाधारित जगणेच मानवजातीला वाचवेल. कार्बनची वाढ थांबवण्यासाठी आणि असलेला कार्बन शोषणारे हरितद्रव्य वाढण्यासाठी उद्योग, शहरे विसर्जित करणे आवश्यक आहे. त्यांनी व्यापलेली व घेतलेली जमीन ज्यांच्याजवळ शेती नाही त्यांना द्यावी. वाढते तापमान, अवर्षण, अवकाळी,  वाळवंटीकरण, वणवे, वादळे, बर्फवृष्टी, अतिवृष्टी, महापूर, समुद्रपातळीतील वाढ, घटते भूजल आणि सतत वाढत्या दुर्घटना आपल्याला जाणीव करून देत आहेत. मानवजातीने प्रगतीच्या नावे स्वतः हा विकासरूपी मृत्यूचा सापळा लावला आहे. त्यातून बाहेर पडणे व तो मोडणे सर्वस्वी त्याच्या हाती आहे. गरज आहे ती योग्य आकलनाची व इच्छाशक्तीची.
      - गिरीश राऊत,
 पर्यावरणाचे अभ्यासक 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: