Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अवकाळी पाऊस व गारपिटीचा 11 जिल्ह्यांना तडाखा : ना. फुंडकर
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: mn1
5मुंबई, दि.12 (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यात प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. चार ते पाच लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मात्र आज 50 तालुक्यातील सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आला असल्याची माहिती दिली. या अस्मानीचा सर्वाधिक फटका बुलढाणा, अमरावती व जालना जिल्ह्याला बसला आहे. प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी व रब्बी हंगामामधील फळ पिकांना त्याचा फटका बसल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी आधीच अडचणीत असताना शनिवारी व रविवारी विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील काही भागाला अवेळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. फळबागा, शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने कालच दिले होते. कृषिमंत्री पांडुरंग पुंडकर यांनी स्वत: आज बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. विविध जिल्ह्यातून सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातल्या सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमध्ये सुमारे 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक फटका बुलढाणा, अमरावती, जालना जिल्ह्याला बसल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. काल या बाधित जिल्ह्यामध्ये कृषी अधिकार्‍यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन व कृषी अधिकार्‍यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित 11 जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराईसह तीन तालुक्यातील 42 गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला आहे. या गावांमधील 10 हजार 632 हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यातील 175 गावांमधील 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यांमधील 23 गावातील 3 हजार 595 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील 38 गावांचा समावेश असून 3 हजार 495 हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहू, कांदा व हरभर्‍याचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसला असून चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील सुमारे 32 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजनगाव सुरजी व चिखलदरा या आठ तालुक्यातील 270 गावातील 26 हजार 598 हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील 101 गावांमधील 4 हजार 360 हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील 36 गावांना, लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्यामधील 59 गावांना याचा फटका बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व उस्मानाबाद हे दोन तालुके, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औढा हे दोन तालुके बाधित झाले आहेत. राज्यातील एकूण 1086 गावातील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. क्षेत्रिय स्तरावरून पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, असे कृषिमंत्री फुंडकर यांनी सांगितले. सरकारच्या प्राथमिक अंदाजात कमी नुकसान झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. पूर्व विदर्भात गारपीट कमी असली, तरी वादळी वारा आणि अवकाळी पावसाने फळबागा, भाजीपाला आणि गव्हाला मोठा फटका बसला. अवकाळी पावसामुळे एकट्या नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातल्या गव्हाला फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे तर पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात साधारण पावणेदोन लाख हेक्टरवरील गव्हाच्या पिकाला याचा फटका बसला आहे. पश्‍चिम विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील गारपीट झालेल्या परिसरातील रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात साधारण साडेसहा लाख हेक्टरवर यावर्षी रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या. यातील साधारण चार लाख हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी झाली आहे. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे पश्‍चिम विदर्भातील हरभर्‍याचे सर्वाधिक नुकसान झाले. अवकाळी पावसाचा मोठा फटका फळबागांनाही बसला. नागपूर, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या बागा असून त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून आज आणि उद्या विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तण्यात आला असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: