Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: mn3
5इस्लामाबाद, दि. 12 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील सुंजवा येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करेल या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. उरी हल्ल्यानंतर भारताने नियंत्रण रेषा पार करत सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केला होता. भारताने हे पाऊल उचलल्यास त्याला प्रत्युत्तर मिळू शकते, अशी धमकीच पाकने भारताला दिली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. भारतावर अनेक आरोपही करण्यात आले आहेत. भारताने सुंजवा हल्ल्याला पाकमधील दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ला जबाबदार धरले आहे. मात्र या हल्ल्यानंतर भारताने केलेले सर्व आरोप पाकिस्तानने फेटाळून लावले आहेत. योग्य तो तपास न करताच भारत नेहमीच बेजबाबदार वक्तव्य करत निराधार आरोप करत आला आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. काश्मिरात सुरू असलेला ‘सशस्त्र विद्रोह’ नियंत्रित करताना होत असलेल्या अत्याचारापासून लक्ष वळवण्यासाठीच भारत असे आरोप करतो, असा गंभीर आरोपही पाकिस्तानने भारतावर केला आहे.
आम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत नसल्याचे पाकिस्तान सतत स्पष्ट करत आला आहे. पाकिस्तान केवळ आत्मनिर्णयाच्या अधिकारांसाठी संघर्ष करणार्‍या काश्मिरी लोकांना राजनैतिक आणि नैतिक समर्थन देतो, असे स्पष्टीकरण पाकिस्तानने दिले आहे.
काश्मीरमध्ये सुरू असलेले अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय भारतावर दबाव आणेल, असा विश्‍वासही पाकिस्तानने व्यक्त केला आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते तसेच त्यांना नियंत्रण रेषेवरून जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले जाते, असे भारताचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचे संवाद रेकॉर्ड करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. या संभाषणांनुसार या हल्ल्याला जैश-ए-मोहम्मद जबाबदार असल्याचे दिसून येते. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार  दहशतवाद्यांकडून असॉल्ट रायफल, यूबीजीएल आणि ग्रेनेड्स जप्त करण्यात आले आहेत. 2016 मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. भारताने यानंतर सर्जिकल स्ट्राइक केला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: