Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn2
जिल्ह्यातील चार खेळाडूंचा समावेश
5मुंबई, दि 12 : राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, या हेतूने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, संघटक यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. 2014-15, 2015-16, 2016-17 या तीन वर्षांचे पुरस्कार आज क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण येत्या 17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सभारंभास राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील 4 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नेमबाजी शिवराज प्रदीप ससे, आशिष शरद माने (गिर्यारोहण), श्रीमती एकता दिलीप शिर्के (आर्चरी), सतीश कृष्णा कदम, सातारा, (खाडी/समुद्र पोहणे), श्रीमती ललिता शिवाजी बाबर (अ‍ॅथलेटिक्स) यांचा समावेश आहे.
क्रीडामंत्री तावडे यांनी सोमवारी बॉम्बे जिमखाना येथे पत्रकार परिषद घेऊन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबतची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत तावडे यांनी शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यासाठी या पुरस्काराच्या नियमावलीत सुधारणा करण्याबरोबरच संबंधित खेळांच्या दर्जेदार स्पर्धांतील कामगिरी विचारात घेण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. खेळाडूंकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सन 2014-15, 2015-16, 2016-17 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), (संघटक/कार्यकर्ते) साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार निवड करण्यासाठी क्रीडा मंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह आयुक्त क्रीडा व युवक सेवा, रघुनंदन गोखले, (द्रोणाचार्य पुरस्कारार्थी), श्रीमती अंजली भागवत, (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारार्थी), श्रीमती शीतल महाजन (पद्मश्री पुरस्कारार्थी), श्रीमती शिला कानुगो, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन प्रतिनिधी, सत्यप्रकाश त्रिवारी व मनोज खैरे पॅरा ऑलिंपिक असोसिएशन प्रतिनिधी सदस्य असलेली समिती गठीत करण्यात आली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: