Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मायणीच्या पाच जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
ऐक्य समूह
Saturday, February 10, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: re1
मायणी अर्बन बँक फसवणूक प्रकरण
5वडूज, दि. 9 : मायणी अर्बन बँकेचे बनावट ओळखपत्र तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयाची व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी मायणी येथील पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी फेटाळला.
याबाबत माहिती अशी, मायणी येथील मुरलीधर खंडू वाघ हे गृहस्थ गेले अनेक वर्षे बेपत्ता आहेत. त्यांच्या नावावर सिटी सर्व्हे नं. 833, एकूण क्षेत्रफळ 71.5 चौ.मी., ग्रामपंचायत मिळकत नं. 1089/24 ही जागा होती. दि. 15 एप्रिल 2013 रोजी  मुरलीधर वाघ यांच्या नावाचे मायणी अर्बन बँकेचे बनावट ओळखपत्र तयार करून या मिळकतीची विक्री करण्यात आली. या मिळकतीचे खरेदीदार प्रशांत निवृत्ती सणगर, विवेक निवृत्ती सणगर, महेंद्र निवृत्ती सणगर, अनिल सुदाम माळी व प्रवीण विलास देशमुखे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. दिलीप येळगावकर व सरपंच सचिन गुदगे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार प्रभारी दुय्यम निबंधक शांताराम बर्गे यांनी या पाच जणांबरोबर मुरलीधर वाघ यांचे बनावट ओळखपत्र तयार करून ते सादर करणारा अनोळखी संशयित, अशा सहा जणांवर वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंद झाला होता. यातील संशयितांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. राजकीय द्वेषापोटी महसूल मंत्र्यांकडे बनावट दस्त प्रकरणी निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली होती. राजकीय दबावाला बळी पडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांनी केला. मात्र, बेपत्ता मुरलीधर वाघ खातेदार नसतानाही त्यांचे मायणी अर्बन बँकेचे बनावट ओळखपत्र तयार करून खरेदीदस्त केला. हे बनावट ओळखपत्र संशयितांनी स्वतः तयार केले आहे. ते कसे आणि कोणाच्या सांगण्यावरून केले? त्यासाठी कोणत्या वस्तू, कागदपत्रे, फोटो वापरला, याचा सखोल तपास आवश्यक आहे. हे संशयित बँकेचे खातेदार नाहीत. बँकेच्या कोणाही अधिकारी वा पदाधिकार्‍याने त्यांना बँकेचे ओळखपत्र दिले नाही. त्यामुळे संशयितांना जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील नितीन गोडसे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून मलाबादे यांनी संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: