Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: mn3
26 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 9 मार्च रोजी राज्याचा 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. पाच आठवड्यांच्या या अधिवेशनात 22 दिवस कामकाज होणार आहे. या अधिवेशनात विधिमंडळात ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारी रोजी सुरू होत असून अधिवेशनाचा कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात झाली. या बैठकीत पाच आठवड्यांचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात 22 दिवस कामकाज चालणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. अर्थसंकल्प 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सादर करण्यात येणार आहे. या अधिवेशनात विधानसभेत एक विधेयक प्रलंबित तर विधानपरिषदेत चार विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय चार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत तर  चार प्रस्तावित अध्यादेश आणि सहा प्रस्तावित विधेयकेही मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात
मोलाचे योगदान देणार्‍या कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी असलेला जन्मदिन हा राज्यात
‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या
पार्श्‍वभूमीवर विधानमंडळात ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्यात येईल. या दिवशी सुरेश भट यांनी लिहिलेली ‘मायबोली’
ही कविता अधिवेशनाच्या सुरुवातीला म्हणण्यात येईल. या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा विभागामार्फत देण्यात येणार्‍या पुरस्कारार्थींना विधिमंडळाच्या गॅलरीत बसवून त्यांचे अभिनंदन करण्यात येईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: