Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जन्मठेपेच्या कैद्याची मंत्रालय इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच असून मेहुणीच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आणि पॅरोलवर काही दिवसासाठी सुटलेल्या हर्षल रावते या तरुणाने आज मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आत्महत्यांचे सत्र रोखण्याचे आव्हान सुरक्षा व्यवस्थेसमोर निर्माण झाले आहे.
धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकर्‍याच्या आत्महत्येमुळे सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत असताना गेल्या आठवड्यात नगरच्या अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणाने आणि सोलापूर जिल्ह्यातील 28 वर्षीय मारुती धावरेने मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणांना वेळीच ताब्यात घेण्यात आले; परंतु आज एका तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याने मंत्रालय शहारले.
आत्महत्या केलेला हर्षल रावते हा मुंबईतील चेंबूरमधील रहिवासी होता. हर्षलच्या वडिलांचे चेंबूरमध्ये मसाल्याचे दुकान आहे. आपल्या मेव्हणीची हत्या केल्यामुळे हर्षलला 14 वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. पैठण येथील तुरुंगात तो 2014 पासून शिक्षा भोगत होता. चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला 30 दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. 10 जानेवारीला तुरुंगातून बाहेर आलेल्या   हर्षलचा पॅरोल उद्या संपणार होता आणि सायंकाळपर्यंत त्याला तुरुंगात हजर व्हायचे होते. त्या आधीच त्याने आज मंत्रालयात येऊन आत्महत्या केली. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झालेल्या हर्षलला तातडीने उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला. हर्षल मंत्रालयात कशासाठी आला होता, कोणाला भेटला, याचा तपास पोलीस घेत आहेत. हर्षलच्या पँटच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात शिक्षा कमी करण्याची विनंती मान्य होत नसल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आल्याचे समजते. मंत्रालयातील सुरक्षा अधिकारी सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रण तपासत असून हा अपघात, घातपात की आत्महत्या, या तिन्ही शक्यता तपासल्या जात असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: