Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर जुलैनंतर व्याज आकारू नका
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : सरकारने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेंतर्गत मंजूर कर्जखात्यांवर बँकांनी 31 जुलै 2017 नंतर व्याज आकारणी करू नये. तसे केल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्व बँकांना दिले.
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेचा मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे तरीदेखील जुलै 2017 नंतर कर्ज खात्यांवर काही बँका व्याज आकारणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बँकांनी अशी व्याज आकारणी करू नये, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
कर्जमाफी योजनेंतर्गत एकूण 31.32 लाख कर्ज खात्यांवर 12 हजार 300 कोटी रुपये रक्कम संबंधित कर्जखात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे. तथापि, शेतकर्‍यांनी अर्जात दिलेली माहिती आणि बँकांकडील माहिती जुळत नसल्याने अशा शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांची माहिती संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहे.
21.65 लाख खात्यांपैकी 13.35 लाख खात्यांची माहिती बँकांनी अपलोड केली आहे. उर्वरित कर्जखात्यांची माहिती पुढील तीन दिवसांत सर्व जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका, व्यावसायिक बँकांनी पोर्टलवर टाकावी. उर्वरित टप्प्यातील रक्कम पात्र खातेदारांच्या कर्जखात्यांवर जमा होण्यासाठी बँक व तालुकास्तरीय समित्यांनी जलदगतीने अचूक काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
एकरकमी परतफेड योजनाचा लाभ  मिळण्यासाठी बँकांनी विशेष मोहीम राबवून शेतकर्‍यांना थकबाकीची उर्वरित रक्कम भरण्यास प्रोत्साहित करावे, जेणेकरून त्यांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देता येईल, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: