Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आले ‘आयजीं’च्या मना....?
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: lo1
पोलीस मुख्यालयासमोरील शांतीदूताचा पुतळा हलवण्याचा डाव
5सातारा, दि. 8 : सातारा पोलीस मुख्यालयासमोर 18 वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला शांतीदूताचा (कबुतर) पुतळा गुरुवारी रातोरात हलवण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. हा पुतळा कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना आवडल्याने तो कोल्हापूरला नेण्याचा घाट घालण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ‘आले आयजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ याचा प्रत्यय पोलिसांना आला आहे. मात्र, याबाबतची खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. 
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेऊन आंदोलन सुरू केले आहे.
सातारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांच्या संकल्पनेतून सातारा पोलीस मुख्यालयासमोर शांतीदूताचा (कबुतर) पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन दि. 14 फेब्रुवारी 2000 रोजी करण्यात आले होते. तेव्हापासून हा पुतळा सातारा पोलीस मुख्यालयाची शान बनला आहे. हाच पुतळा कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नजरेत भरला. त्यांनी हा पुतळा हलवून कोल्हापूर येथे पाठवण्याच्या सूचना सातारा पोलिसांना दिल्याचे समजते. त्यांच्या सूचनेवरून पोलिसांनी हा पुतळा रातोरात हलवण्याचा घाट घातला होता. त्यानुसार गुरुवारी रात्री जेसीबी लावून हा पुतळा काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
पोलिसांच्या या कारनाम्याची कुणकुण लागताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरामन व सामाजिक कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांची गुपचूप सुरू असलेली मोहीम उघड झाली. राज्य पोलीस दलात अफाट कामगिरी केलेले आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे हे सातारा पोलीस अधीक्षक असताना त्यांच्या संकल्पनेतून शांतीचा संदेश देणार्‍या कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयासमोर बसवण्यात आला. खोपडे यांनी पोलीस दलात असताना पारधी पुनर्वसनासारखे सामाजिक उपक्रमही हाती घेतले होते. खोपडे यांनी बसवलेला हा पुतळा सातारा पोलीस मुख्यालयाची शान बनला आहे. हाच पुतळा काढून घेऊन तो ‘आयजीं’च्या सेवेला पाठवण्याचे ठरले होते. त्यामुळे सातारकरांमध्ये नाराजी असून पुतळा काढण्यास विरोध होत आहे. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, रवींद्र कांबळे, प्रशांत जगताप यांनी तेथे धाव घेऊन शांततामय मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पोलिसांना हा पुतळा काढणे शक्य झाले नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क होऊ शकला नाही. पुतळा हटवण्यामागचे नेमके गौडबंगाल काय आहे, याचा उलगडा होऊ शकलेला नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: